Manoj Jarange Patil: ‘त्या’ व्हायरल क्लीपचा सोर्स कोण? जरांगेंनी शिंदेंच्या खास शिलेदारांचं नाव घेतलं
"माझ्या विरोधात बोलण्यासाठी 30 -35 जणांची टोळी तयार केली आहे. त्यांना पूर्ण ताकद दिली जात आहे. एकनाथ शिंदे हे करत आहेत. आतापर्यंत फडणवीस करत होते मात्र आता एकनाथ शिंदे ही करत आहेत. असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या कथित ऑडियो क्लीपने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. 500 कोटी रुपयांच्या व्यवहाराचा उल्लेख असलेली ही ऑडियो क्लीप नेमकी कोणी दिली? कशी समोर आली? याबाबत गेल्या काही दिवसांपासून तुफान चर्चा होताना दिसत आहेत. अशातच आता मनोज जरांगे पाटील यांनी याबाबतच सर्वात मोठा अन् महत्त्वाचा खुलासा केला आहे.
काय म्हणालेत मनोज जरांगे पाटील?
“व्हायरल झालेल्या रेकॉर्डिंगमधून मराठ्यांबद्दल किती द्वे्ष आहे हे समोर आले, त्यांचा डाव हाणून पाडला. या ऑडियो क्लीपचे सोर्स सांगता येणार नाहीत. माझ्या ऐवजी रामदास कदम यांच्याकडून त्याचा सोर्स घ्यावा. मूळ डिव्हाईस त्यांच्याकडेच आहे. त्यांना याबाबत माहिती आहे.यामध्ये गरिबाचे लोक असते तर अगोदर अटक करुन मग चौकशी केली असती. मात्र आता एसआयटी अगोदर नेमली आहे. अजून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही, रामदास कदम यांच्याकडे मूळ डिव्हाईस आहे, त्यासाठी शोधायची गरज काय? माझ्याआधी दोन तास आधी त्यांनी ती क्लीप वाजवली” असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हणाले.
तसेच “माझ्या विरोधात बोलण्यासाठी 30 -35 जणांची टोळी तयार केली आहे. त्यांना पूर्ण ताकद दिली जात आहे. एकनाथ शिंदे हे करत आहेत. आतापर्यंत फडणवीस करत होते मात्र आता एकनाथ शिंदे ही करत आहेत. मी एवढ्या दिवसात हे सगळं काढलं वर्ष-सहा महिने जर मोकळा राहिलो तर सगळं काढेल मुळासकट. माझ्या लोकांमध्ये त्यांची लोकं त्यांनी घातले आहेत.आता कोणालाच नाराज करत नाही कोणावर तीन महिने बोलणार नाही,” असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये?
दरम्यान, यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरही भाष्य केले. – 10- 20 वर्षातुन पहिल्यांदाच दिवाळीसाठी घरी आलो आहे. पाण्याची परिस्थिती भीषण आहे, सर्वत्र फळबागा देखील जळून गेल्या आहेत. दिवाळीच्या खूप शुभेच्छा पण यावेळी आनंद कोणाच्याच चेहऱ्यावर नाही, सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे कुणीही हट्ट केला नाही पाहिजे, साध्या पद्धतीने दिवाळी साजरी केली पाहिजे. हे संकटं पिढ्यानपार पाहिले आहेत कोणत्याही शेतकऱ्याने आत्महत्या करू नये, असं ते म्हणालेत.