Sanjay Raut : बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे गटाला भोपळा, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
Sanjay Raut : "ही अक्कल तुम्हाला आधी यायला पाहिजे होती. उमेदवार ठरवताना. सर्व सर्व पक्षांशी चर्चा केली असती, तर सर्वसंमतीने नाव आलं असतं, असं नाव ठरवता अनेक घटकांचा त्याच्याशी संबंध नाही" असं संजय राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन लढवलेली पहिली निवडणूक म्हणजे बेस्ट पतपेढीची निवडणूक. या निवडणुकीत ठाकरे गटाचा दारुण पराभव झालाय. त्यावर आज संजय राऊत यांना पत्रकारांनी विचारल. त्यावर ते म्हणाले की, “बेस्टच्या पतपेढीच्या निकालावर जिंकलं कोण? माझ्याकडे खरोखर माहिती नाही. मी पूर्ण माहिती घेतल्याशिवाय बोलणार नाही. मी काहीच माहिती घेतली नाही. मला माहितच नाही. एका पतपेढीची निवडणूक आहे. मला माहितच नाही या विषयावर. या स्थानिक निवडणुका असताता. मला खरोखरच माहित नसेल तर प्रश्न विचारु नका. मी माहिती घेऊन बोलेन”
“पतपेढ्यांच्या निवडणुका या ट्रेड युनियनच्या असतात. ठाकरे ब्रांड कधीच फेल होणार नाही. पतपेढीची निवडणूक म्हणजे परीक्षा नाही. चाचणी परीक्षा नाही. ज्या युनियनचे जास्त सदस्य असतात, तिथे बऱ्याच काळापासून शरद राव याची युनियन आहे. त्यामुळे त्यांना यश मिळण्याची शक्यता जास्त होती. या निवडणुका पक्षीय बलावर लढल्या जात नाहीत. फार मोठं यश कोणाला मिळालय अस मला वाटत नाही. आमचे जे लोक या निवडणुकीत होते, त्यांना तुम्ही विचारा” असं संजय राऊत म्हणाले.
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांना फोन
“उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक आता होतेय. या निवडणुकीत आज तरी एनडीएकडे बहुमताचा आकडा आहे. हे बहुमत कशाप्रकारे जमा केलं जात, हे देशात कोणाला सांगायला नको. काल त्यांच्याकडे बहुमत असतानाही दिल्लीतल्या अनेक प्रमुख नेत्यांनी इंडिया आघाडीतल्या नेत्यांना फोन करुन राधाकृष्णन यांना मतदान करण्याची विनंती केली. जर तुमच्याकडे बहुमत आहे, मग फोन का करावा लागतो?. याचा अर्थ तुमचं बहुमत अस्थिर चंचल आहे. म्हणून तुम्हाला उपरराष्ट्रपतीपदासाठी विरोधकांच्या नेत्यांना फोन करावे लागतात” असं संजय राऊत म्हणाले.
‘ही अक्कल तुम्हाला आधी यायला पाहिजे होती’
“ही अक्कल तुम्हाला आधी यायला पाहिजे होती. उमेदवार ठरवताना. सर्व सर्व पक्षांशी चर्चा केली असती, तर सर्वसंमतीने नाव आलं असतं, असं नाव ठरवता अनेक घटकांचा त्याच्याशी संबंध नाही” असं संजय राऊत म्हणाले.
