
राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. आज उमेदवारी मिळालेल्या सर्व उमेदवारांनी अर्ज दाखल केला. अनेक असे कार्यकर्ते आहेत जे उमेदवारीसाठी इच्छुक होते, मात्र पक्षाकडून त्यांना तिकीट नाकारण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही नेत्यांनी बंडखोरी केली आहे, तर काहींनी पक्षांतराचा मार्ग निवडला आहे. सांगलीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या अनेक नाराज इच्छुक उमेदवारांनी शिवसेनेत प्रवेश करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
सांगलीमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे, उमेदवारी डावलल्यामुळे भाजपच्या माजी उपमहापौरासह भाजपा इच्छुकांनी भाजपाला सोडचिट्टी देत शिवसेनेत प्रवेश करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सांगलीच्या प्रभाग 14 मधील भाजपाचे माजी उपमहापौर युवराज बावडेकर यांच्यासह भाजपच्या इच्छुक उमेदवारांना उमेदवारी डावलण्यात आली आहे. त्यामुळे युवराज बावडेकर आणि भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी भाजपला रामराम करत थेट शिवसेना शिंदे गटातून आपली उमेदवारी दाखल केली आहे, त्यामुळे भाजपाला आता प्रभाग 14 मध्ये शिवसेना शिंदे गटाचे आव्हान असणार आहे.
वसई विरारमध्येही भाजपला बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता आहे. भाजपचे तीन वेळा एकमेव नगरसेवक असणारे किरण भोईर यांचे तिकिटे कापण्यात आले असून प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय अशोक शेळके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र आता भोईर यांनी बंडखोरी करत वॉर्ड क्रमांक 22 मधून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. पक्षाने मला विश्वासात न घेताच माझी उमेदवारी डावलली आहे. मी पक्ष श्रेष्ठींकडे अनेकवेळा बोलण्याचा प्रयत्न केला पण माझ्याशी कोणीही संपर्क साधला नसल्याचा आरोप भोईर यांनी केला आहे.
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणुकीतही भाजपला दणका फटका बसला आहे. भाजपच्या अनेक माजी नाराज नगरसेवकांनी मनसेत प्रवेश केला आहे. डोंबिवली पश्चिमेत शैलेश धात्रक, पूजा धात्रक, मनीषा धात्रक आणि कल्याण पूर्वेत शितल मंढारी या भाजपच्या 4 माजी नगरसेवकांना मनसेकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
शितल मंढारी यांनी सांगितले की, ‘आधी उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून कार्यरत होते, त्यानंतर भाजपकडून संपर्क साधण्यात आला की आमच्या कडे उमेदवार नाही आणि तुम्हालाच जागा दिली जाईल असा विश्वास देत भाजपमध्ये प्रवेश करवून घेण्यात आला. मात्र महायुतीची चर्चा सुरू असतानाच भाजपने त्यांचा विचार न करता दुसऱ्या पक्षाला पॅनल दिला. इतकेच नाही तर आम्हाला स्वतःहून बोलावून पक्षात घेतले, मात्र उमेदवारीच्या वेळी आम्हाला डावलले.’
मुंबई महानगर पालिकेच्या शिवडी प्रभागातही भाजपमध्ये फूट पडली आहे. भाजपच्या जान्हवी राणे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जान्हवी राणे मागील 15 वर्षापासून भाजपात कार्यरत आहेत, मात्र वॉर्ड 205 मधून वर्षा शिंदे यांना उमेदवारी दिल्याने त्या नाराज होत्या, त्यामुळे आता त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे.