
राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. 15 जानेवारीला मतदान पार पडणार अजून 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम अवघ्या एका महिन्यात पार पडणार आहे. अशातच आता निवडणूक जाहीर होताच राजकीय पक्षांना रणनीती तयार करण्यास सुरुवात केली आहेत. त्याच बरोबर पक्षांतरालाही सुरुवात झाली आहे. अनेक नेत्यांनी आपल्या सोयीच्या पक्षात प्रवेश करण्यास सुरूवात केली आहे. नवी मुंबईत ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. 4 बड्या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आज हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
महानगर पालिकांच्या निवडणुका जाहीर होताच नवी मुंबईत ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी नगरसेवक मनोहर कृष्णा मढवी (एम के मढवी ) आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार आहे. त्यांच्यासोबत 3 नगरसेवक देखील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मढवी यांनी 2024 ची विधानसभा निवडणूक ठाकरे गटाकडून लढवली होती. गणेश नाईक आणि विजय चौगुले यांच्या विरोधात ते ठाकरे गटाकडून मैदानात होते. मात्र त्यांचा पराभव झाला होता.
मनोहर कृष्णा मढवी यांच्याकडे ऐरोली बेलापूर विधानसभा मतदार संघाचे संपर्कप्रमुख पद आहे. ऐरोली मतदारसंघात त्यांचे मोठे वर्चस्व आहे. त्यांच्या प्रवेशाने महापालिका निवडणुकीत शिवसेनेची ताकद वाढणार आहे. महत्वाचे म्हणजे एम के मढवी यांना 27 एप्रिल 2024 ला ठाणे खंडणी विरोधी पथकाने 2.5 लाखांची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली अटक केली होती, मात्र आता ते शिवसेनेचा झेंडा हाती घेणार आहेत. एम के मढवी त्यांच्या सोबत विनया मढवी (पत्नी), करण मढवी (मुलगा) तसेच काँग्रेसच्या माजी नगरसेविका पूनम पाटील, त्यांचे पती मिथुन पाटील यांच्यासह इतर नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
उद्धव ठाकरेंना दोन दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर वॉर्ड क्रमांक 1 च्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरे गटाला रामराम करत भारतीय जनता पक्ष (भाजप) मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. मुंबईतील भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. ‘माझ्या प्रभागात विकासाची कामे करण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे. तसेच अभिषेकच्या हत्येप्रकरणी गती येण्यासाठी मी भाजपात प्रवेश केला’ असं तेजस्वी यांनी म्हटले आहे.