मोठी बातमी! काँग्रेसचा भाजपला धक्का, मोठा पक्षप्रवेश, घडामोडींना वेग
दोनच दिवसांपूर्वी भाजपने पालघरमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे. दरम्यान त्यानंतर आता पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे आता भाजपलाच मोठा धक्का बसला असून, काँग्रेसमध्ये मोठा पक्षप्रवेश झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा पक्षांतरला वेग आल्याचं पहायला मिळत आहे. एका पक्षाचे नेते दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. दोनच दिवसांपूर्वी भाजपने पालघरमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे. माजी आमदार श्रीनिवास वनगा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हा शिवसेना शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे महापालिका निवडणुकीनंतर एकमेकांचे नेते एकमेकांच्या पक्षात घ्यायचे नाहीत, असं ठरलेलं असताना देखील श्रीनिवास वनगा यांनी भाजपात प्रवेश केला आहे. यावरून शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी नाराजी देखील व्यक्त केली होती. दखल घेतली जाईल असं त्यांनी म्हटलं होतं.
दरम्यान पालघरमध्ये शिवसेनेला भाजपने धक्का दिला तर दुसरीकडे शुक्रवारी रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने देखील शिवसेना शिंदे गटाला धक्का दिला आहे. खासदार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या सर्व घडामोडी सुरू असतानाच आता पुण्यामधून देखील एक मोठी बातमी समोर येत आहे.
आता पुण्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. इंदापूर तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्ह्यातील नेते मयूरसिंह पाटील यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. हा भाजपसाठी इंदापूरमध्ये मोठा धक्का मानला जात आहे. मयूरसिंह पाटील हे भारतीय जनता पक्षाचे कोअर कमिटी सदस्य म्हणून कार्यरत होते. त्यांनी पक्ष संघटनेत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रासोबतच सहकार क्षेत्रातही त्यांचा मोठा अनुभव आहे. त्यांनी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तसेच इंदापूर तालुका दूध उत्पादक संघाचे चेअरमन म्हणून देखील काम पाहिले आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील राजकीय आणि सहकार क्षेत्रात त्यांचा मोठा दबदबा आहे, त्यांनी भाजपची साथ सोडून आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे तालुक्यात काँग्रेसची ताकद वाढणार आहे.