
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं वार वाहतं आहे. प्रचाराला देखील रंगत आली आहे. येत्या दोन डिसेंबर रोजी राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर त्यानंतर लगेचच म्हणजे तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. यंदा राज्यात अनेक ठिकाणी महायुतीमधीलच घटक पक्ष एकमेकांविरोधात उभे राहिल्याचं चित्र पहायला मिळत आहे. काही ठिकाणी भाजप विरोधात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट तर काही ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाविरोधात शिवसेना शिंदे गट आणि भाजप तर काही ठिकाणी शिवसेना शिंदे गटाविरोधात भाजप आणि राष्ट्रवादी अशी युती झाल्याचं पहायला मिळत आहे. तर अनेक ठिकाणी हे तीनही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत.
दरम्यान प्रचार रंगात असताना महायुतीच्या नेत्यांकडूनच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत आहे, त्यामुळे सध्या नाराजीचं वातावरण असल्याचं पहायला मिळत आहे. भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे, त्याचा फटका शिवसेना शिंदे गटाला बसल्यानं शिवसेना शिंदे गट देखील नाराज आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांनी भाजपावर घणाघाती टीका केली आहे. दरम्यान आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.
तळेगाव नगरपरिषदेतील एका बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकाला आता पुन्हा एकदा निवडणुकीच्या प्रक्रियेला सामोरे जावं लागणार आहे. तळेगाव नगरपरिषदेमध्ये एक नगराध्यक्ष अधिक 27 नगरसेवक अशा एकूण 28 जागा आहेत, त्यापैकी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 10 जागा तर भाजपच्या 9 जागा या बिनविरोध निवडून आल्या होत्या. मात्र आता यामध्ये मोठा ट्विस्ट आला आहे. यात प्रभाग क्रमांक 7 अ च्या स्नेहा खांडगे बिनविरोध नगरसेवक झाल्या होत्या, मात्र नगरसेवक पदी विराजमान होण्याआधीचं त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. त्यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या प्रक्रियेला सामोरे जावं लागणार आहे. स्नेहा खांडगे या घड्याळाच्या चिन्हावर बिनविरोध निवडून आल्या होत्या, त्यामळे हा अजित पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे.