
गेल्या काही वर्षांपासून राज्याच्या राजकारणात मोठे भूकंप पहायला मिळाले होते. सर्वात आधी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड करत 40 पेक्षा जास्त आमदार फोडत भाजपसोबत युती करत सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर काही दिवसांनी राष्ट्रावादीतही फूट पडली होती. अजित पवार यांनीही बऱ्याच आमदारांसह बाहेर पडत महायुती सरकारमध्ये सामील होण्याची निर्णय घेतला होता. या दोन घटनांमुळे राज्याच्या राजकारणाची चर्चा संपूर्ण देशात झाली होती. अशातच आता राज्यात पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाचे निम्म्यापेक्षा जास्त आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेच्या एका मंत्र्याने केला आहे. त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूरमध्ये सुरुवात झाली आहे. या अधिवेशनासाठी राज्यातील सर्व मंत्री आणि आमदार नागपूरमध्ये पोहोचले आहेत. अशातच आता शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे 13 आमदार माझ्या संपर्कात असल्याची माहिती शिरसाट यांनी टिव्ही 9 मराठीला दिली आहे. या सगळ्या आमदारांची नावे माझ्याकडे आहेत. वेळ आल्यावर सांगेन असं शिरसाट यांनी म्हटलं आहे. ठाकरे शिवसेनेच्या कार्यपद्धतीला वैतागून शिंदेंच्या शिवसेनेत येण्याचा आमदारांचा मानस असल्याचेही शिरसाट यांनी म्हटले आहे.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या 20 उमेदवारांनी विजय मिळवला होता. यातील 13 आमदार आता शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. भविष्यात असं झाल्यास उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता आगामी काळात नेमकं काय होणार याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी याआधी मोठा दावा केला होता. शिवसेना शिंदे गटाचे 22 आमदार भाजपच्या गळाला लागल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार पलटवार केला आहे. जर असं म्हटलं तर उद्या कोणही म्हणू शकेल की आदित्य ठाकरेंचे वीस आमदार आहेत, ते ही भाजपच्या गळाला लागले आहेत. असं कोणाच्या म्हणण्याने थोडच काही होतं, असं यावेळी देवेंद्र फडणीस यांनी म्हटलं आहे.