मोठी बातमी! भाजपला महापालिका निवडणुकीपूर्वी मोठा धक्का, रवींद्र चव्हाणांनी बोलावली तातडीची बैठक, घडामोडींना वेग

महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे, अनेक ठिकाणी महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर आली असून, भाजपला मोठा धक्का बसला आहे.

मोठी बातमी! भाजपला महापालिका निवडणुकीपूर्वी मोठा धक्का, रवींद्र चव्हाणांनी बोलावली तातडीची बैठक, घडामोडींना वेग
रवींद्र चव्हाण
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Dec 28, 2025 | 3:53 PM

राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे, नव्या आलेल्या लोकांना अनेक ठिकाणी महापालिका निवडणुकीचं तिकीट पक्षाकडून दिलं जात असल्यानं निष्ठावंत नाराज असल्याचं चित्र आहे, अनेक ठिकाणी निष्ठावंतांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. आता कल्याण, डोंबिवलीमधून मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेच्या जागा वाटपावरून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे.  त्यानंतर पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तातडीनं त्यांच्या डोंबिवलीमधील निवासस्थानी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार  रवींद्र चव्हाण यांच्या बैठकीत अनेक भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे.  रवींद्र चव्हाण यांच्या बैठकीनंतर भाजपचे जनरल सेक्रेटरी रवी गायकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. आजचा दिवस आमच्यासाठी काळा असल्याची प्रतिक्रिया यावेळी रवींद्र गायकर यांनी दिली आहे.

नेमकं काय म्हणाले गायकर? 

अकरा वर्षे भाजपसाठी निष्ठेने काम केले, आज मात्र आमच्यावर अन्याय होत आहे.  लोकसंख्या वाढली असूनही युतीमुळे सर्वच निष्ठावंतांचे पत्ते कट करण्यात आले आहेत.  महायुती नकोच, पण युती करायचीच असेल तर जागावाटप अर्धे–अर्धे करा अशी आमची मागणी आहे.  निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे, असं यावेळी गायकर यांनी म्हटलं आहे.

कल्याण–डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपाचा जो फॉर्म्यूला ठरला आहे, त्यावरून भाजपमधील असंतोष उफाळून येताना दिसत आहे.  काल रात्री कल्याण पूर्वेला भाजपला 7 च जागा देण्यात आल्याने  पूर्वेतील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार सुलभा गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर गोंधळ घालत घोषणाबाजी केली होती.  पूर्वेनंतर आता कल्याण पश्चिमेतही भाजपला 9 जागाच देण्यात आल्यानं  भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि माजी नगरसेवक रस्त्यावर उतरले आहेत. ‘युती नको’ अशा जोरदार घोषणा दिल्या जात आहेत.पालिका निवडणूक ही कार्यकर्त्यांची असून त्यांच्यावर अन्याय सहन केला जाणार नाही, असा ठाम इशाराच यावेळी देण्यात आला आहे.