भाजपमध्ये खळबळ! माजी खासदार नाराज? महत्त्वाचे पद नाकारल्याने चर्चांना उधाण

Maharashtra Politics : भाजपचा एक माजी खासदार नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. या खासदाराने एक महत्त्वाचे पद नाकारले आहे. त्यामुळे या खासदाराची नाराजी समोर आली आहे.

भाजपमध्ये खळबळ! माजी खासदार नाराज? महत्त्वाचे पद नाकारल्याने चर्चांना उधाण
BJP Flag
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Dec 08, 2025 | 8:27 PM

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अनेक नेते पक्षांतर करत आहेत. अशातच आता भाजपचा एक माजी खासदार नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. या खासदाराने एक महत्त्वाचे पद नाकारले आहे. त्यामुळे या खासदाराची नाराजी समोर आली आहे. या माजी खासदाराचे नाव किरीट सोमय्या असे आहे. मुंबई भाजपचे 144 सदस्यांच्या समितीचे सदस्य म्हणून किरीट सोमय्या यांची निवड करण्यात आली होती, मात्र त्यांनी हे पद नाकारले आहे. त्यामुळे त्यांची नाराजी समोर आली आहे.

किरीट सोमय्या नाराज?

किरीट सोमय्या यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी म्हटले की, मुंबई भाजप अध्यक्ष यांनी “मुंबई भाजपाचे 144 सदस्यांचा समितीचे सदस्य” म्हणून नियुक्ती केली, धन्यवाद. मी ते नाकारले आहे, मी सामान्य कार्यकर्ता म्हणून अधिक जोमाने काम करीत आहे, करणार असे त्यांना कळविले आहे. बांगलादेशी मुक्त मुंबई हे लक्ष्य साकार करणार. यावरून वेगवेगळ्या तर्क वितर्कांना सुरूवात झाली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

यावर बोलताना भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ‘मागच्या वेळी सुद्धा किरीट सोमय्या यांना आम्ही पोस्ट घ्या म्हटलं होतं, मात्र त्यांनी कुठली पोस्ट न घेता महाराष्ट्रभर फिरून त्यांनी पक्षाचे काम केलं. त्यांना पोस्ट घेऊन काम करण्यात इंटरेस्ट नसतो, विना पोस्ट ते काम करत असतात. मी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष असताना ज्या जबाबदार्‍या दिल्या, त्या त्यांनी पूर्ण केल्या. त्यांनी जो विषय घेतला असेल ते काम पूर्ण करतात.

मागच्या वेळी त्यांनी जन्माचे खोटे दाखले बांगलादेशी लोकांना दिले जायचे याबाबत त्यांनी मोठी मोहीम राज्यात राबवली. त्यांनी अनेक कागदपत्रे शोधून काढली आणि राज्याच्या हिताचा काम केलं. किरीट सोमय्या यांनी एवढेच म्हटलं असेल की मला पद नको मी पक्षासाठी काम करेल.

महायुतीत मतभेद?

महायुतीतील मतभेदाबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, मी वारंवार सांगतो की महायुतीच्या नेत्यांमध्ये मतभेद असू शकतात, मनभेद नाहीत. एखादी ठिणगी पडली असेल तर ती निवडता येते. हे समजून घेता येत. काही लोक जर समजत असतील की आमच्यामध्ये खूप मनभेद आणि मतभेद आहे, तसं बिलकुल नाही. मतभेद असू शकतात मनभेद नाहीत.