भाजपकडून पक्ष प्रवेशासाठी 100 कोटींची ऑफर होती- शशिकांत शिंदे

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी अनेक माध्यमातून माझ्याशी संपर्क केला होता.| Shashikant Shinde

  • संतोष नलावडे, टीव्ही 9 मराठी, सातारा
  • Published On - 15:15 PM, 23 Jan 2021
भाजपकडून पक्ष प्रवेशासाठी 100 कोटींची ऑफर होती- शशिकांत शिंदे

सातारा: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी असताना भाजपकडून मला पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी केले. भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात अनेक नेत्यांना पक्षप्रवेशाच्या ऑफर देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये माझाही समावेश होता, असा दावा शशिकांत शिंदे यांनी केला. (Shashikant Shinde reveals that Devendra Fadnavis and Chandrakant patil gave him offer to join BJP)

ते शनिवारी साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी शशिकांत शिंदे यांनी भाजपच्या ऑफरसंदर्भात धक्कादायक खुलासा केला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी अनेक माध्यमातून माझ्याशी संपर्क केला होता. तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केल्यास तुम्हाला मंत्रिपद देऊ. तसेच तुम्हाला निवडून आणण्यासाठी पोटनिवडणुकीत भाजपकडून 100 कोटी रुपये खर्च केले जातील, असेही मला सांगण्यात आले होते, असा दावा शशिकांत शिंदे यांनी केला. मात्र, त्यावेळेस मी ऑफर नाकारली व भविष्यातही नाकारतच राहीन, असेही शिंदे यांनी सांगितले.

कोण आहेत शशिकांत शिंदे?

शशिकांत शिंदे हे राज्यातील प्रमुख मराठा नेत्यांपैकी एक आहेत. ते पवार कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांपैकी एक म्हणून ओळखले जातात. सातारा जिल्ह्यातील राजकारणात त्यांचा दबदबा आहे. कोरेगाव मतदारसंघातून ते दोनदा विधानसभेवर निवडून गेले होते.

मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा धक्का बसला होता. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांचे विधानपरिषदेत पुनर्वसन करण्यात आले होते. मुंबई आणि नवी मुंबईतील माथाडी कामगारांचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळेच शरद पवार यांनी यंदा नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत गणेश नाईक यांचे साम्राज्य खालसा करण्याची जबाबदारी शशिकांत शिंदे यांच्यावर सोपविली आहे.

संबंधित बातम्या:

साताऱ्यात दोन दिग्गजांची गळाभेट, उदयनराजे आणि शशिकांत शिंदेंच्या भेटीने चर्चा

मुख्यमंत्र्यांसमोर शशिकांत शिंदे म्हणाले, आमची निष्ठा शरद पवारांवर, उद्धव ठाकरेंकडून शब्द, सूडाने वागणार नाही

“चंद्रकांतदादा, विचारपूर्वक वक्तव्य करा, नाहीतर…” राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदेंचा पुन्हा हल्लाबोल

(Shashikant Shinde reveals that Devendra Fadnavis and Chandrakant patil gave him offer to join BJP)