Vidhan Sabha Election : भाजपकडून विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर, या दिग्गजांना मोठा धक्का, कोणाचं तिकीट कापलं?
भाजपकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये पक्षाकडून आधीच्याच सर्व आमदारांना पुन्हा एकदा संधी दिल्याचं दिसून येत आहे.
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. अखेर विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात महायुतीमध्ये भाजपनं बाजी मारली असून, पक्षानं आज उमेदवारांच्या नावाची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपच्या पहिल्या यादीमध्ये 99 उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. उमेदवारांच्या नावाची घोषणा करताना अनेक ठिकाणी भाजपनं पूर्वीच्याच आमदारांना संधी दिल्याचं दिसून येत आहे. आता भाजपनंतर लवकरच शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची यादी देखील जाहीर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान भाजपच्या पहिल्या यादीमध्ये पूर्वीच्या दोन आमदारांचं तिकिट कापण्यात आलं आहे. कामठी मतदारसंघामध्ये भाजपचे टेकचंद सावरकर हे आमदार होते. मात्र यावेळी त्यांचा पत्ता कट करण्यात आला असून, त्यांच्याजागी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आता निवडणूक लढवणार आहेत. तर दुसरीकडे चिंचवड विधानसभा मतदार संघातून अश्विनी जगताप यांच्याऐवजी भाजपकडून शकंर जगताप हे निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत.
सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता यावेळची निवडणूक महायुतीविरोधात महाविकास आघाडी अशीच रंगणार आहे. मात्र महायुती आणि महाविकास आघाडीमधील कोणत्या घटक पक्षांच्या वाट्याला किती जागा येणार याबाबत आता उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यातच भाजपकडून आता उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीमध्ये 99 उमेदवारांचा समावेश आहे. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून देखील आता लवकरच उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीमध्ये अजूनही जागा वाटपाच्या मुद्द्यावर बैठकांचं सत्र सुरूच असल्याचं दिसून येत आहे. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून तणाव असल्याची चर्चा आहे. मात्र आमच्यामध्ये जागावाटपावरून कुठलाही वाद नसून, लवकरच यादी जाहीर केली जाईल असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.