Chandrashekhar Bawankule | ‘चहा पाजणे म्हणजे ही मीडियाची न्यूज होऊ शकत नाही’, भाजपाच्या ‘या’ नेत्याकडून बावनकुळेंचा बचाव
Chandrashekhar Bawankule | भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे विरोधी पक्षाच्या रडारवर आहेत. त्यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला जातोय. भाजपाच्या नेत्यांकडून आता बावनुकळे यांचा बचाव करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

अहमदनगर (कुणाल जायकर) : सध्या सर्वत्र राजकीय वर्तुळात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कथित ऑडिओ क्लिपची चर्चा आहे. 2024 निवडणुकीपर्यंत पत्रकारांनी आपल्याविरोधात बातमी छापू नये, यासाठी काय करायच ते चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. पत्रकारांना चहा प्यायला घेऊन जा. त्यांना चहा प्यायला बोलवायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे तुम्हाला समजलंच असेल. त्यांना ढाब्यावर जेवायला घेऊन जा. आपल्याविरोधात एकही बातमी छापली जाता कामा नये, असं या ऑडिओ क्लिपमध्ये ते म्हणताना ऐकू येतय. अहमदनगरमधील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतील ही क्लिप असल्याच बोलल जातय. चंद्रशेखर बावनकुळे यांची ही कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका सुरु आहे.
विरोधी पक्षांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीकेची झोड उठवलीय. आता भाजपा आमदार राम शिंदे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. “भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बोलण्याचा मीडियाने विपर्यास केला” अस राम शिंदे म्हणाले. पत्रकारांना चहापाणी द्या आणि ढाब्यावर न्या असं वक्तव्य बावनकुळे यांनी केलं होतं. या वक्तव्यावरून विरोधकांवर टीका करत राम शिंदे यांनी बावनकुळे यांची पाठराखण केली. “चंद्रशेखर बावनकुळे यांचा बोलण्याचा तसा उद्देश नव्हता. आपण अतिथी देवो भव म्हणतो. आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करणे त्याला चहा पाजणे म्हणजे ही मीडियाची न्यूज होऊ शकत नाही” असं राम शिंदे यांनी सांगितलं. ‘चहा कुणाला पाजायचा हे कार्यकर्त्यांना माहिती असतं’
“विरोधकांना आता हे जास्तच बोचायला लागलं आहे. भारतीय जनता पार्टीचा हा झंझावात महाराष्ट्रभरामध्ये सुरू आहे. 45 प्लसचा नारा भाजपने दिलेला आहे. म्हणून हे आमच्या विरोधकांचे ट्रोल करण्याचे षडयंत्र आहे” असं राम शिंदे म्हणाले. पुढच्यावर्षी देशात लोकसभा निवडणूक आहे. त्याचे पडघम आतापासूनच वाजायला लागले आहेत. राजकीय नेत्यांचे विविध भागात दौरे सुरु आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशाच एका दौऱ्यात हे कथित वक्तव्य केल्याची चर्चा आहे. ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी सुद्धा बावनकुळे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. “चंद्रशेखर बावनकुळे हे वाचळवीर आहेत. चहा कुणाला पाजायचा हे कार्यकर्त्यांना माहिती असतं, पत्रकारांना कसं सांभाळायचं हे माहिती असतं, बावनकुळे हे कधीही काहीही बोलतात, नॉलेज नसताना बडबड करतात” अशी टीका खैरे यांनी केली.
