आता केवळ भाग्याचाच सहारा… मोदींच्या ग्रहदशेवरील टीकेनंतर भाजपचा राऊतांवर पलटवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या पुढील ग्रहस्थितीचा उल्लेख केला. त्यानंतर आता भाजपनेही राऊतांवर जोरदार पलटवार केला आहे.

आता केवळ भाग्याचाच सहारा... मोदींच्या ग्रहदशेवरील टीकेनंतर भाजपचा राऊतांवर पलटवार
Sanjay Raut Narendra Modi
Image Credit source: social media
| Updated on: Sep 18, 2026 | 4:47 PM

काहीच शक्य होत नाही, जनता भाव देत नाही, त्यामुळे संजय राऊत यांना आता केवळ भाग्याचा सहारा उरलाय, अशा शब्दांत भाजपा प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त राऊत यांनी केलेल्या पोस्टला बन यांनी उत्तर दिले. राऊत यांनी मोदींना शुभेच्छा देतानाच त्यांच्या पुढील ग्रहदशेबाबत भाष्य केले होते. त्यावर बन यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

मोदींचा 75 वा वाढदिवस साजरा झाला असून ते आता 76 वर्षांचे झाले आहेत. त्यांना उत्तम दीर्घायुष्य लाभो, असे राऊत यांनी पोस्टच्या सुरुवातीलाच म्हटले. त्यानंतर त्यांनी मोदींच्या पुढील काळातील ग्रहस्थितीचा उल्लेख केला. आपण ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक असल्याचे राऊत यांनी पोस्टमध्ये म्हटले. मात्र, आपण अंधश्रद्धाळू नसल्याचेही त्यांनी सांगितले.

राऊतांची पोस्ट जशास तशी

ग्रह रजेवर जात नाहीत! पंतप्रधान मोदींचा ७५ वा वाढदिवस साजरा झाला. ते आता ७६ वर्षांचे झाले. त्यांना उत्तम दीर्घायुष्य लाभो. विषय थोडा वेगळा आहे. भाजपने आवाहन केले की मोदींच्या वाढदिवशी दिवे पेटवा.(त्यासाठी लाखो लिटर तेल,कापूर आणि माचीस बॉक्स ची व्यवस्था करण्यात आली)काही ठिकाणी गणेशोत्सवात आरती आणि महाआरतीचे आयोजन झाले. यज्ञ आणि होमहवन केले गेले.का? तर मोदी यांना पुढच्या काळासाठी ऊर्जा मिळावी म्हणून अनेक आध्यात्मिक कार्यक्रम राबवले. अचानक असे काय झाले?की मोदींसाठी आशिर्वादांचे दिवे पेटवण्याचे फर्मान सुटले? विषय थोडा वेगळा आहे. मी ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक आहे. पण अंधश्रद्धाळू नाही. १७ सप्टेंबर मोदींचा जन्मदिवस आहे. मोदींच्या पुढील ग्रहदशा त्यांना सत्तेच्या राजयोगापासून दूर नेणारी आहे. १७ सप्टेंबरला सूर्य कन्या राशीत प्रवेश करतोय. १८ सप्टेंबरला मंगळ कर्क राशीत जातोय. कर्क राशीत मंगळ नीच स्थानी असतो. म्हणजे कमजोर होतो. हे सोप्या भाषेत सांगायचे तर हा कमजोर मंगळ दोन गोष्टी नक्की घडवतो: • सरकार आणि सत्तेला धक्का देतो, सुरंग लावतो. • संघर्ष आणि तीव्र आंदोलनाचा माहौल तयार करतो.राजकीय भूकंपाचे धक्के देतो, नीच स्थानातला हा मंगळ सत्तेच्या दहाव्या भावाकडे पाहतो. संघर्षाच्या सहाव्या भावाकडे पाहतो. आणि त्या सहाव्या भावाचा स्वामी शुक्राकडेही पाहतो. दहाव्या भावात राहू बसला आहे. हा योग आजच्या राज्यकर्त्यां टोळ्यांसाठी अशुभ आहे. त्यामुळे काय होईल? देशात असंतोषाचा मोठा भडका उडेल. आंदोलने होतील. आंतरराष्ट्रीय कारस्थानांचा फटका बसेल. अंतर्गत बंडाळी वाढेल,त्यात सत्तापरिवर्तनही घडू शकते. या अशुभ काळाची चाहूल लागल्यामुळे गेल्या बारा वर्षांत पहिल्यांदाच सत्तेच्या स्थैर्यासाठी आणि मोदींच्या आरोग्यासाठी भक्तांना आशिर्वादाचे दिवे लावायला सांगितले जात आहे. त्यातून मोदींना ऊर्जा मिळेल, असे सांगितले जात आहे. १७ तारखेपासून कठीण काळ सुरू होत आहे. ग्रहदशा कुणालाही बदलता येत नाही. दिवे लावा, काहीही करा… ग्रह कधीच रजेवर जात नाहीत! होय ग्रह कधीच सुट्टीवर जात नाहीत ते सदैव ड्यूटी वर असतात पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा! जय महाराष्ट्र!

दरम्यान, राऊत यांच्या पोस्टला उत्तर देताना नवनाथ बन यांनी उद्धव ठाकरे यांचाही उल्लेख केला. ‘त्यांच्या कुंडलीतील सर्वात मोठा मंगळ दुसरा-तिसरा कुणी नाही, तो संजय राऊत हाच आहे,’ अशी टीका बन यांनी केली.

 

 

 

बन यांची पोस्ट जशास तशी

काहीच शक्य होत नाही, जनता भाव देत नाही, त्यामुळे संजय राऊत यांना आता केवळ भाग्याचा सहारा. आता तर उद्धव ठाकरेंनाही कळेल असेल की त्यांच्या कुंडलीतील सर्वात मोठा मंगळ दुसरा-तिसरा कुणी नाही, तो संजय राऊत हाच आहे.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us