छात्रों की गुंज नाही ही तर पैसे की गुंज, गर्दी जमवण्यासाठी कोट्यवधींचं ‘रेट कार्ड’, भाजपचा राहुल गांधींवर गंभीर आरोप

आज पुण्यामध्ये राहुल गांधी यांचा छात्रों की गुंज हा कार्यक्रम होणार आहे, मात्र दुसरीकडे या कार्यक्रमावरून भाजपने काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत, या कार्यक्रमासाठी पैसे वाटण्यात आल्याचा आरोप नवनाथ बन यांनी केला आहे.

छात्रों की गुंज नाही ही तर पैसे की गुंज, गर्दी जमवण्यासाठी कोट्यवधींचं ‘रेट कार्ड’, भाजपचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
Navnath Ban
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 22, 2026 | 10:43 AM

आज काँग्रेस नेते राहुल गांधी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत, ते पुण्यामध्ये छात्रों की गुंज कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून जोरदार वातावरण निर्मिती सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्यापूर्वीच शुक्रवारी रात्री एनएसयू आणि अभाविपमध्ये जोरदार राडा झाल्याचं पहायला मिळालं आहे. दरम्यान त्यानंतर आता राहुल गांधी यांच्या छात्रों की गुंज कार्यक्रमावरून भाजपनं राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी या कार्यक्रमावरून राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल करताना ही छात्र की गुंज नाही ही तर पैसे की गुंज असल्याचं म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले नवनाथ बन? 

राहुल गांधींचा पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ नाही तर ‘पैसों की गूंज’ कार्यक्रम आहे. राहुल गांधींच्या कार्यक्रमाला लोक उत्स्फूर्तपणे येत नाहीत, म्हणून काँग्रेस पैसे देऊन गर्दी जमवत आहे. राहुल गांधींच्या कार्यक्रमातून काँग्रेसचे नवे पीपीपी मॉडेल म्हणजे ‘पेड पॉलिटिकल प्रोग्राम’ समोर आले आहे. असा आरोप यावेळी भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे, दरम्यान त्यांनी यावेळी काही व्हिडीओ देखील दाखवले आहेत.  मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमासाठी समाजमाध्यमांवरील प्रभावशाली व्यक्तींना प्रत्येकी ३० ते ३५ हजार रुपये देण्याची ऑफर देण्यात आली.  या संपूर्ण प्रकरणामागे नेमका कोणाचा हात आहे, याची चौकशी सरकारने करावी अशी मागणी यावेळी नवनाथ बन यांनी केली आहे. राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी काँग्रेसकडून पैसे देऊन गर्दी आणि समाजमाध्यमांवर वातावरण तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त कार्यक्रम नसून काँग्रेसचा ‘पेड पॉलिटिकल प्रोग्राम’ आहे, असा हल्लाबोलही यावेळी बन यांनी केला आहे.

सुमारे ३ हजार लोकांना प्रत्येकी ३० ते ३५ हजार रुपये देऊन कार्यक्रमाला आणले जात असेल, तर त्यासाठी तब्बल ९ कोटी ते १० कोटी रुपये खर्च होतात. म्हणजे राहुल गांधींना पुन्हा राजकीयदृष्ट्या रिलाँच करण्यासाठी केवळ गर्दी जमवण्यावरच जवळपास दहा कोटी रुपयांचा खेळ सुरू असल्याचा आरोप यावेळी नवनाथ बन यांनी केला आहे .

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us