‘संजय राऊत बिनकामी माणूस, 10-20 जणांवर टीका केल्याशिवाय झोपत नाहीत’
धनगर आरक्षणासाठी आज सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये आणि तहसीलदार कार्यालयामध्ये निवेदन देण्यात येणार आहे. "धनगर समाजाच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहेत. लोक आस लावून बसले आहेत" असं गोपीचंद पडळकर म्हणाले. धनगड राज्यात अस्तित्वात नाहीत हे सरकारने लिहून दिलं आहे असं त्यांनी सांगितलं.

मुंबई (निवृत्ती बाबार) : “गेल्या 50 दिवसांपासून धनगर आरक्षणासाठी आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होतो, मोठा संघर्ष समाजाचा सुरू आहे. राज्यभर आमचे सहकारी उपोषणाला बसलेले आहेत, सरकारने आमच्याकडे 50 दिवसांची वेळ मागितली होती, बाहेरच्या राज्यांमध्ये त्यांच्या अधिकारांमध्ये जीआर काढले आहेत तसे महाराष्ट्र सरकारने जीआर काढावा अशी आमची मागणी होती” असं आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले. “50 दिवसात कमिटी स्थापन करू आणि त्यावर निर्णय घेऊ. पण असं काही झालं नाही. त्यामुळे आम्ही आज सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये आणि तहसीलदार कार्यालयामध्ये निवेदन देणार आहोत” असं गोपीचंद पडळकर म्हणाले. त्यांनी संजय राऊत यांच्यावरही टीका केली. “संजय राऊत मोकळा माणूस आहे. बिनकामी माणूस आहे. त्यांचा तो स्वभाव आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत दहावीस जणांवर टीका केल्याशिवाय ते झोपत नाहीत. लोक त्यांना अजिबात सिरीयस घेत नाहीत, त्यांनी ठाकरे घराण्याचं वाटोळ केलं” असं गोपीचंद पडळकर म्हणाले.
“सर्व ठिकाणी लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहून निवेदन देणार आहोत. सरकारला आठवण करून देणार आहोत की, 50 दिवसांची मुदत संपली आहे तात्काळ कार्यवाही करा. धनगर समाजाच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहेत. लोक आस लावून बसले आहेत, योग्य तो निर्णय त्यांनी घ्यावा” असं गोपीचंद पडळकर म्हणाले. “सुप्रिया सुळे यांचा या आरक्षणाशी संबंध नाही, अडीच वर्षाच्या काळात सुप्रिया सुळे यांच्या वडिलांचे नेतृत्वाखाली सरकार होतं तेव्हा त्यांनी काय केलं?” असा सवाल पडळकरांनी विचारला. “एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आमची सातत्याने केस चालू झाली, हे सरकार आल्यानंतर दोन इफिडिव्हिट दिली आहेत. आमचा ठाम विश्वास आहे की आम्हाला आरक्षण मिळेल” असं गोपीचंद पडळकर म्हणाले.
‘आमच्या भावनांचा अंत बघू नका’
“धनगड राज्यात अस्तित्वात नाहीत हे सरकारने लिहून दिलं आहे. विश्वास आहे की, आम्हाला न्याय मिळेल. आमचे चहुबाजूने प्रयत्न सुरू आहेत. सरकारने जीआर काढावा असे देखील आमचं म्हणणं आहे” असं गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं. “आज तहसीलदारांना जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत. आम्ही एवढेच सांगतोय की आमच्या भावनांचा अंत बघू नका तुम्ही तात्काळ निर्णय घ्या निर्णय नाही घेतला, तर आम्ही नागपूर अधिवेशनावेळी मोठ्या मोर्चाचं आयोजन करू” असं गोपीचंद पडळकर म्हणाले.
‘मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही’
“गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना वेगळे आरक्षण दिलं होतं, ओबीसीच्या आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये कारण त्यांची संख्या मोठी आहे. गरीब मराठा समाजाला आरक्षण तात्काळ द्यावे, मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया जोरदार सुरू आहे, त्या आरक्षणाला आमचा विरोध नाही” असं गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केलं.