आदेश आला! मोदींच्या उपस्थितीत भाजपाची महत्त्वाची बैठक, मुंबईत घडामोडींना वेग!

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांसाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. असे असताना आता राजधानी मुंबईत मोठ्या घडामोडी घडत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार भाजपाच्या आमदार, खासदारांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे.

आदेश आला! मोदींच्या उपस्थितीत भाजपाची महत्त्वाची बैठक, मुंबईत घडामोडींना वेग!
mumbai bjp meeting
| Updated on: Oct 08, 2025 | 5:52 PM

Narendra Modi BJP Meeting : राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असून रणनीती आणि डावपेच यांवर मोठा खल चालू आहे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांसाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी नुकतेच नवी मुंबईतील विमानतळाचे उद्घाटन केले आहे. असे असतानाच आता राजधानी मुंबईमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. भाजपाच्या गोटात पडद्यामागे मोठ्या हालचाली होत असून आता मोठी अपडेट समोर आली आहे. भाजपाच्या मुंबईतील सर्व आमदार आणि खासदारांची एक बैठक बोलावण्यात आली आहे.

रात्री आठ वाजता होणार बैठक

मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपाचे आमदार आणि खासदार यांच्यासोबत बैठक घेणार आहेत. आज (8 ऑक्टोबर) रात्री आठ वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीत मोदी आमदार, खासदारांसोबत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करतील. या बैठकीचा नेमका विषय समजू शकलेला नाही. मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात बैठकीत चर्चा होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

देवेंद्र फडणवीस हेदेखील राहणार उपस्थित

भाजपाचे मुंबईतील आमदार आणि खासदारांची मोदी चर्चा करणार आहेत. रात्री आठ वाजता राजभवन येथे ही बैठक होईल. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: उपस्थित राहणार आहेत. सोबतच मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम हेदेखील या बैठकीला उपस्थित असतील. आगामी मुंबई पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक फार महत्त्वाची मानली जात आहे.

मुंबई जिंकण्यासाठी डावपेच

दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक अजित पवारांची राष्ट्रवादी, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपा एकत्र लढवणार आहेत. महायुती म्हणून ते महाविकास आघाडीला सामोरे जाणार आहेत. या निवडणुकीत मुंबईची महापालिका सर्वाधिक महत्त्वाची असणार आहे. मुंबईवरील ठाकरेंचे वर्चस्व कमी करण्यासाठी काहीही झालं तरी मुंबई पालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाकडून डावपेच आखले जात आहेत. एकनाथ शिंदे यांनीदेखील या निवडणुकीसाठी आपली ताकद लावलेली आहे. असे असताना आता नरेंद्र मोदी मुंबईतले भाजपाचे आमदार आणि खासदार यांच्याशी बोलणार आहेत. त्यामुळे आता या बैठकीतून नेमके काय समोर येईल? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.