‘ऊर्जामंत्री आणि हे सरकार निर्लज्ज’, भाजप आमदाराचा घणाघात

सरकारच्या माध्यमातून मध्यम वर्गीय आणि गरीब माणसांची लूट होते हे आता सिद्ध होत आहे, अशी टीका रविंद्र चव्हाण यांनी केली (BJP MLA Ravindra Chavan slams Nitin Raut).

'ऊर्जामंत्री आणि हे सरकार निर्लज्ज', भाजप आमदाराचा घणाघात
भाजप आमदार रविंद्र चव्हाण

कल्याण (ठाणे) : वाढीव विजबिलाविरोधात मनसेने नवी भूमिका घेतली आहे. या नव्या भूमिकेवर भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांना प्रश्न विचारला असता त्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर सडकून टीका केली. “ऊर्जामंत्री आणि हे सरकार एवढं निर्लज्ज आहे की, सर्वसामान्यांनी मागणी करुनही या सरकारने विज बिलासंदर्भात निर्णय घेतला नाही. सरकारच्या माध्यमातून मध्यम वर्गीय आणि गरीब माणसांची लूट होते हे आता सिद्ध होत आहे”, अशी टीका रविंद्र चव्हाण यांनी केली (BJP MLA Ravindra Chavan slams Nitin Raut).

कल्याणच्या पत्रीपुलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला रविंद्र चव्हाण यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. त्याचबरोबर पत्रीपुलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात ज्या विकास कामांचे उद्घाटन झाले ते सर्व पूर्वीचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मंजूर झालेले आहेत, असा दावा त्यांनी केला (BJP MLA Ravindra Chavan slams Nitin Raut).

मनसेची वाढीव विजबिलाविरोधात नवी भूमिका नेमकी काय?

वाढीव वीजबील प्रकरणात मनसेने नवी भूमिका जाहीर केली आहे. उद्योगपती अडाणी आणि उर्जामंत्र्याविरोधात राज्यातील सर्व पोलिस स्थानकांमध्ये तक्रारी देण्याचे आदेश मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या नेते-कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजबीलासंदर्भात यूटर्न घेतल्याने त्यांच्याविरोधात भारतीय दंड विधान संहिता कलम 420 अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मनसेने केली आहे. यासाठी राज्यातील सर्व पोलिस स्थानकांमध्ये तक्रारी देण्याचे आदेश मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या नेते-कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

कोरोना संसर्गाच्या काळात सर्वसामान्य लोकांना वाढीव बीजबील आलं. हेच वाढीव वीजबील कमी करुन लोकांना दिलासा देऊ, असं आश्वासन उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिलं होतं. मात्र काहीच दिवसांत त्यांनी त्यांच्या आश्वासनावरुन यू-टर्न घेतला. आपल्या आश्वासनांची पूर्तता होत नाही, हे लक्षात आल्यानंतर उर्जामंत्र्यांनी आपल्या भूमिकेत बदल केला.

वीज ग्राहकांनी वीज बिल भरलं नाहीतर महावितरणनं वीज कापण्याचा इशारा दिलाय. सरकारचा हा निर्णय तुघलकी असल्याचं सांगत सरकारने भानावर येऊन ज्या जनतेने आपल्याला सेवेची संधी दिलीय त्या जनतेच्या भल्याचे निर्णय घ्यावेत, असं मनसेने म्हटलं आहे.

हेही वाचा :

लोकांना अंधारात ढकलणाऱ्या सरकारला गाडून टाका, वीज बिल मुद्यावर मनसे आक्रमक

राजू शेट्टींचा वीज बिलाच्या प्रश्नाला हात, महाविकास आघाडीवर पुन्हा घणाघात

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI