
महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांना भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी टोला लगावला आहे. “कुठल्याही महापुरुषावर जर काहीतरी आपण बोललो, वादग्रस्त बोललो की आपोआप पब्लिसिटी मिळते, आपोआप टीव्हीवर येतो.. हे अशा लोकांना वाटतं ज्यांना कशातनंच काही साध्य होत नाही. मग कुठे छत्रपती शिवाजी महाराजांवर बोला, कुठे छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोला, जुना इतिहास बाहेर काढून तो तोडून-मोडून लोकांपुढे मांडायचा आणि त्याला वेगळाच दुजोरा द्यायचा. ही एक फॅशन झाली,” असं ते म्हणाले. त्याचप्रमाणे अशी वक्तव्ये करणाऱ्यांवर कडक कारवाई करायला हवी, असं त्यांनी म्हटलंय.
याविषयी ते पुढे म्हणाले, “यावर एकच उपाय आहे की कोणावर तरी कडक कारवाई होऊन एक उदाहरण लोकांसमोर आणायला पाहिजे. हे प्रकार छत्रपती शिवाजी महाराज असू दे, छत्रपती संभाजी महाराज असू दे किंवा देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील सर्व महापुरुष असू दे, यांच्यावर आपण बोललो की कारवाई कडक होते, हे उदाहरण लोकांसमोर आणलं पाहिजे. त्यांना थोडे दिवस तुरुंगात ठेवलं पाहिजे. कारण अटक झाल्यानंतर लगेच कोर्टासमोर हजर केल्यावर त्यांना जामीन मिळतो. मग कायदा थोडा असा पाहिजे की अजामीनपात्र असल्यावर या लोकांना तुरुंगात चार दिवस बसवलं की जरा त्यांना अद्दल घडेल. तिथला हालहवाल कळेल. बाहेर आल्यावर त्यांना मग त्याच्यावर पण बोलू दे.”
महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांविरोधात काही कायदा आणणार का, असा प्रश्न त्यांना विचारला गेला. त्यावर उत्तर देताना “शेवटी कायदा आणत असताना त्यातून पळवाट निघू नये यावर लक्ष ठेवावं लागतं. आरोपीला सुटता आलं नाही पाहिजे. शिक्षा झाली पाहिजे असा कायदा नक्की येईल,” असं आश्वासन त्यांनी दिलं.
याआधी अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली होती. “राहुल सोलापूरकरांनी कोणत्या हेतूने हे वक्तव्य केलं, ते तपासलं गेलं पाहिजे. या माध्यमातून महाराष्ट्रात अशांतता पसरवण्याचा डाव आहे का? हेही बघितलं पाहिजे. वादग्रस्त बोलायचं आणि राज्य अशांत करायचं, हा खेळ चाललाय”, असं ते म्हणाले होते. सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त व्यक्त केलं होतं. “महाराजांना आग्र्यातून सुटण्यासाठी पेटारे-बिटारे असं काहीच नव्हतं. औरंगजेबाच्या अनेक सरदारांना लाच देऊन ते आग्र्याहून सुटले होते”, असं सोलापूरकर म्हणाले होते.