BMC Election : किती तरले, किती ठरले अवैध ? मुंबई महापालिकेत अखेर किती उमेदवार भिडणार ?

मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 साठी 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारीला निकाल लागेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारसभा व रोड शोने मुंबईतील राजकीय वातावरण तापले आहे. ठाकरे बंधू 'मुंबई वाचवा'चा नारा देत असताना, महायुती विजयाचा दावा करत आहे. एकूण किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत ?

BMC Election : किती तरले, किती ठरले अवैध ? मुंबई महापालिकेत अखेर किती उमेदवार भिडणार ?
मुंबई महापालिका निवडणुकींसाठी किती उमेदवार रिंगणात ?
Image Credit source: social media
| Updated on: Jan 03, 2026 | 9:52 AM

राज्यात जरी 29 महापालिकांची निवडणूक घोषित झाली असली तर प्रामुख्याने सर्वंच लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेची (BMC Election) निवडणूक अतिशय महत्वाची ठरताना दिसत आहे. एकीकडे ठाकरे बंधू मुंबई वाचवा, मुंबई वाचवा असा नारा देत असताना मुंबईत महायुतीचाच महापौर होईल असा दावा महायुतीच्या नेत्यांकडून केला जात आहे. महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारांचे अर्ज भरून झाले, बंडखोरीही करून झाली, काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने बंडोबांना थंड करण्याचेही प्रयत्न झाले, मनधरणी झाली. अनेकांनी माघार घेतली तर काहींचे अर्ज अवैध ठरल्याने ते बाद झाले. अखेर आता मुंबई महापालिका निवणुकीसाठी किती उमेदवार मैदानात उतरणार त्याचा अंतिम आकडा समोर आली आहे. आता एकूण 1 हजार 700 उमेदवार निवडणूक लढवण्यास सज्ज आहेत.

राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्रतर्फे अंतिम उमेदवारांची संख्या समोर आली असून 1700 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आज, म्हणजेच शनिवार 3 जानेवारी 2026 रोजी निवडणूक लढविणा-या उमेदवारांची अंतिम प्रसिद्ध केली जाणार आहे. 15 जानेवारीला महापालिका निवडणुकांसाठी मतदान होणार असून दुसऱ्याच दिवशी 16 जानेवारील मतमोजणी होऊन निकाल लागेल. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत 30 डिसेंबर होती. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत शुक्रवार, दिनांक 2 जानेवारी पर्यंत होती.

समोर आलेल्या माहितीनुसार, काल 2 जानेवारी पर्यंत एकूण 1700 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.  अवैध नामनिर्देशन पत्रे 167 होती, तर वैध नामनिर्देशन पत्र ही 2 हजर 231 होती, तर 453 उमेदवारांनी आपली अर्ज मागे घेतले. ही निवडणुक मोठी चुरशीची ठरणार आहे.

मुंबईच्या महासंग्रामासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रचाराचा झंझावात

मुंबई महापालिकेच्या महासंग्रामासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रचाराचा झंझावात दिसणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या मुंबईत 6 पेक्षा अधिक सभा असून अनेक ठिकाणी रोड शोचे आयोजन करण्यात आलं आहे. सभा आणि रॅलीसोबतच जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी टॉक शो आणि मान्यवरांच्या भेटीगाठींवर भर देण्यात येणार आहे. ठाकरे बंधूंनी केलेले आरोप आणि त्यांच्या टीकेला मुख्यमंत्री काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या सभांना लवकरच सुरुवात होणार आहे. मात्र त्यापूर्वी आज वरळीत फडणवीस आणि शिंदेंच्या उपस्थितीत संयुक्त मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच जाहीर मुलाखतीच्या माध्यमातून फडणवीस हे विकासाचे व्हिजन मांडणार आहेत.

ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी एकूण 649 उमेदवार रिंगणात

15 जानेवारी रोजी होत असलेल्या ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी 9 प्रभागसमिती मधून माघार घेतलेल्या उमेदवाराअंती एकूण 649 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 9 प्रभागसमितीमधून एकूण 1107 नामनिर्देशनपत्रे 30 डिसेंबर 2025 पर्यंत दाखल झाली होती . 1 व 2 जानेवारी रोजी मिळून एकूण 269 उमेदवारांनी माघार घेतल्याने आता 649 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आज म्हणजेज, 3 जानेवारी रोजी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येणार असल्याचे, आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी नमूद केले.

दरम्यान 29 मनपात बिनविरोध निवडून आलेल्यांची आकडेवारी समोर आली आहे.  कल्याणमध्ये भाजपचे सगळ्यात जास्त 15 नगरसेवक बिनविरोध निवडून आले तर शिवसेनेचे 7 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत.

छत्रपती संभाजीनगरमध्ये 859 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात 

छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीमध्ये 115 नगरसेवक पदासाठी 859 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात सर्वाधिक उमेदवार हे उबाठाचे आहेत. उबाठा शिवसेनेने या निवडणुकीत तब्बल 97 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत.  त्या पाठोपाठ भाजपने 94 उमेदवार उभे केले आहेत. तर शिंदे यांच्या शिवसेनेने 92 उमेदवारांना संधी दिली आहे.

काँग्रेसने 77 तर अजित दादांची राष्ट्रवादी काँग्रेस 77 जागेवर उभी आहे. वंचित बहुजन आघाडीचे 62, एमआयएमचे 48, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे 25, बसपाचे 21, रिपाई आठवले गटाचे 6 आणि अपक्ष 260 असे 859 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

 नाशिक महापालिका निवडणुकीत 122 जागांसाठी 729 उमेदवार लढवणार निवडणूक

अर्ज माघारी नंतर नाशिक महापालिका निवडणुकीत 122 जागांसाठी 729 उमेदवार रिंगणात आहेत. सर्वाधिक 118 जागांवर भाजप लढणार असन शिवसेना शिंदे गटाकडून देखील 102 उमेदवार रिंगणात आहेत.  राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून 42 उमेदवार , ठाकरेंच्या शिवसेनेने 79 तर मनसेने 30 जागांवर उमेदवार दिले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे 30 उमेदवार निवडणूक लढवत असून काँग्रेसने देखील 22 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. वंचितचे 55 उमेदवार  आणि अपक्ष व इतर असे एकूण 212 उमेदवार देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत.   आज पासून खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात होणार असून तब्बल 729 उमेदवार नाशिक मनपा निवडणुकीत आपलं भवितव्य आजमावणार आहेत.