Rahul Narvekar : धमकावण्याच्या व्हायरल व्हिडिओवर अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सोडलं मौन
Rahul Narvekar : जिथे बिनविरोध निवडणुका झाल्या आहेत. त्यावर निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला आहे. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निवडणूक आयोग त्यांचं काम करेल असं उत्तर दिलं.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर हरिभाऊ राठोड यांनी गंभीर आरोप केले आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना हा सर्व वाद झाला. राहुल नार्वेकर भाजप उमेदवारांसोबत तिथे आले होते. त्याचवेळी हरिभाऊ राठोड तिथे आले. “नार्वेकर 5 वाजेपर्यंत इथे होते, येरझाऱ्या मारत होते. मला त्यांनी धमकी दिली, सिक्युरिटी कोणी दिली तुम्हाला? असं मला विचारलं“ असे आरोप हरिभाऊ राठोड यांनी केले. या सर्व आरोपांना राहुल नार्वेकर यांनी उत्तर दिलं आहे. “माझ्यावर केलेले आरोप हास्यास्पद आहेत. आपला पराभव लपवण्यासाठी केले जाणारे आरोप आहेत“ असं राहुल नार्वेकर म्हणाले.
“मुंबईत 36 आमदार आहेत, सगळ्या 36 आमदारांनी आपापल्या मतदारसंघातील आपले उमेदवार आहेत, त्यांच्यासोबत जाऊन अर्ज भरला. मी पण कुलाब्याचं प्रतिनिधित्व करतो. माझ्या उमेदवारांबरोबर जाऊन , प्रत्येक उमेदवाराला अपेक्षित असतं आपला आमदार आपल्याबरोबर यावा त्याप्रमाणे मी तिकडे गेलेलो“ असं राहुल नार्वेकर स्पष्टीकरण देताना म्हणाले. “निवडणूक आयोगाचा नियम आहे, एका उमेदवाराबरोबर दोन व्यक्ती जाऊ शकतात. त्या नियमात राहूनच आम्ही तिकडे गेलो. तिकडे गेल्यानंतर Ro ऑफिस मधून बाहेर येतांना माजी विधान परिषद सदस्य आणि त्यांच्याबरोबर आलेली टोळी ह्यांनी मला घेरलं. घेरून धक्काबुक्की करणं, घेराव घालणं, आपल्याला दिलेल्या सुरक्षेचा दुरुपयोग करणे हा कुठला योग्य प्रकार आहे?” असा सवाल राहुल नार्वेकर यांनी विचारला.
‘तुम्हाला हलू देणार नाही हे कोण बोलत होतं‘
“कुणी जर दुरुपयोग करत असेल तर संबंधित अधिकाऱ्याला सांगून त्यावर कारवाई करण्यास सांगणं माझं कर्तव्य आहे. पोलिंग स्टेशनवर मी जाणं अनुचित होतं तर, हरिभाऊ राठोड तिकडे पूजा करायला गेले होते का?“ असा सवाल राहुल नार्वेकर यांनी विचारला. “संविधानाचा भंग होईल असं कार्य आमच्याच्याने कधीही होणार नाही. त्यात बघा विधानसभा अध्यक्षांना कोणी घेराव टाकला, त्यांच्याबरोबर कोण हुज्जत घालत होत, RO नां बाहेर पडू देणार नाही, तुम्हाला हलू देणार नाही हे कोण बोलत होतं“ असं राहुल नार्वेकर म्हणाले.
