
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. महायुतीसह महाविकास आघाडीचे नेते प्रचारात व्यस्त आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याच्या विविध भागात जाऊन प्रचारसभा घेत आहेत. याच प्रचाराच्या धामधुमीत एकनाथ शिंदे यांनी टीव्ही 9 मराठीला खास मुलाखत दिली. यावेळी शिंदेंनी विविध मुद्यांवर भाष्य केले आहे. आगामी मुंबई महापालिकेतील युतीबाबतही एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.
मुंबई महापालिका निवडणुकीबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबई महापालिकेत आम्ही महायुती म्हणून एकत्र लढणार आहोत. मुंबईत महायुतीची सत्ता येईल आणि महायुतीचाच महापौर होईल. कारण गेल्या निवडणुकीत निवडून आलेले जवळपास 70 नगरसेवक शिवसेनेकडे आहेत. 2012 पासूनचे काही लोक आमच्यासोबत आहेत, जवळपास 125 लोक आणच्याकडे आहेत. त्यामुळे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचा आगामी निवडणुकीत विजय होईल आणि महायुतीचा महापौर होईल.
गेल्या 15 ते 20 वर्षांमध्ये मुंबईचा जो विकास व्हायला हवा होता तो झाला नाही. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबईतील सर्व रस्त्यांच काँक्रिटीकरण झालं पाहिजे आणि मुंबई खड्डे मुक्त झाली पाहिजे यासाठी आम्ही पाऊल उचललं. पुढच्या एक दीड वर्षांमध्ये संपूर्ण काम पूर्ण झालेलं असेल. मुंबईत मेट्रोची आणि कारशेडची कामे थांबली होती ती आता वेगाने होत आहेत. आरोग्य सुविधेवर आम्ही भर दिला आहे. हा सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण होतील.
आजच्या मुलाखतीत बोलताना एकनाथ शिंदे यांनी महायुतीतील कथित नाराजीनाट्यावरही भाष्य केलं. त्यांनी म्हटले की, ‘मी प्रचार करतोय. देवेंद्र फडणवीस, अजित पवार प्रचार करत आहेत. आम्ही प्रचारात आघाडीवर आहोत. काही ठिकाणी आमची भाजपाशी युती आहे, काही ठिकाणी अजितदादा यांच्याशी युती आहे. लोकांना स्थानिक पातळीवरील विकास पाहिजे. मैत्रीपूर्ण लढतीत एकमेकांवर टीका न करता सकारात्मक पद्धतीने, विकासात्मक प्रचार करायचा, असं आम्ही ठरवलेलं आहे, जे काही वाद होते ते आता संपलेले आहेत.