BMC Election: सस्नेह जय महाराष्ट्र… ठाकरे गटाच्या माजी नगरसेविकेची पोस्ट चर्चेत

BMC Election 2025: मुंबई महापालिकेच्या निवडणूकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. या आरक्षण सोडतीने अनेक राजकीय पक्षांच्या समीकरणे बदलली आहेत. यामुळे ठाकरे गटाच्या माजी नगरसेविकेने निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

BMC Election: सस्नेह जय महाराष्ट्र... ठाकरे गटाच्या माजी नगरसेविकेची पोस्ट चर्चेत
Tejaswi Ghosalkar
| Updated on: Nov 11, 2025 | 10:43 PM

संपूर्ण राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीची लगबग सुरु आहे. अवघ्या काही दिवसांमध्ये मुंबई महापालिकेची निवडणूकही जाहीर होण्याची शक्यता आहे. आता मुंबई महापालिकेच्या निवडणूकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. या आरक्षण सोडतीने अनेक राजकीय पक्षांच्या समीकरणे बदलली आहेत. ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते विनोद घोसाळकर यांच्या सून तेजस्विनी घोसाळकर यांचा वॉर्ड क्रमांक 1 आता मागासवर्ग प्रवर्ग (OBC) म्हणून आरक्षित झाला आहे. तेजस्विनी घोसाळकर गेल्या काही दिवसांपासून या वॉर्डात निवडणुकीची तयारी करत होत्या. मात्र आता त्यांना निवडणूक लढवता येणार नाही. याबाबत त्यांनी माहिती दिली आहे.

तेजस्वी घोसाळकरांची पोस्ट चर्चेत

तेजस्वी घोसाळकरांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, सस्नेह जय महाराष्ट्र ! आज मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी आरक्षणाची सोडत जाहीर झाली. माझ्या वार्ड क्रमांक 1 मध्ये नागरिक प्रवर्ग म्हणजेच ओबीसी (OBC) आरक्षण घोषित झालं आहे. मी ओबीसी प्रवर्गातील नसल्यामुळे ही निवडणूक लढवू शकत नाही, ही गोष्ट माझ्यासाठी अत्यंत दुःखद आहे. परंतु दुःख ह्याचे नाही की, मी निवडणूक लढवू शकत नाही, दुःख हे आहे की, मी आता माझ्या प्रभागातील तसेच दहिसर विधानसभा मतदारसंघातील सामान्य माणसाची सेवा प्रत्यक्ष लोकप्रतिनिधी म्हणून करु शकणार नाही.’

पुढे आपल्या पोस्टमध्ये तेजस्वी घोसाळकर यांनी म्हटले की, ‘या निर्णयामुळे माझ्या जनसेवेचा मार्ग थांबणार नाही. कारण अभिषेकच्या जाण्यानंतर माझ्या घोसाळकर कुटुंबीयांइतकीच साथ मला ह्या प्रभागातील तसेच दहिसर-बोरिवलीतील सगळ्या लोकांनी दिलेली आहे. म्हणूनच आज, उद्या आणि येणाऱ्या प्रत्येक काळात, माझ्या प्रभागातील, तसेच संपूर्ण दहिसर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी, त्यांच्या वैयक्तिक, सामाजिक किंवा सार्वजनिक अडचणींसाठी, मी नेहमीप्रमाणेच, अर्ध्या रात्रीसुद्धा त्यांच्या सेवेसाठी तत्पर राहीन, ही माझी मनापासूनची खात्री आणि वचन आहे.

मिलिंद वैद्य यांनाही आरक्षण सोडतीचा फटका

तेजस्वी घोसाळकर यांच्यासह ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मिलिंद वैद्य यांनाही आरक्षण सोडतीचा फटका बसला आहे. त्यांचा वॉर्ड क्रमांक 182 हा आधी सर्वसाधारण गटात होता. तो आता ओबीसी (मागासवर्ग प्रवर्ग) म्हणून आरक्षित झाला आहे. त्यामुळे वैद्या यांनी दुसऱ्या वॉर्डातून निवडणूक लढवावी लागण्याची शक्यता आहे.