
राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. आज मुंबईतील सर्व उमेदवारानी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची महायुती आहे. शिवडी विधानसभेतील प्रभाग क्रमांक 204 मधून शिवसेनेकडून अरुण दळवी आणि माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दोघांनीही शिवसेनेकडून अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे एकाच जागेसाठी शिवसेनेने दोन उमेदवार दिले आहेत. त्यामुळे या निवडणुकीतून माघार कोण घेणार हा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
शिवडी विधानसभेतील प्रभाग क्रमांक 204 मधून शिवसेनेकडून अरुण दळवी आणि माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दोन्ही उमेदवारांनी शिवसेनेच्या AB फॉर्मवर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अरुण दळवी यांनी भाजपमधून काल शिंदे सेनेत प्रवेश करून सेनेकडून उमेदवारी मिळवली आहे, तर माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांना ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करून AB फॉर्म घेऊन उमेदवारी अर्ज भरला आहे.
प्रभाग क्रमांक 204 च्या उमेदवारीची चर्चा आता रंगली आहे. 2 जानेवारीला अर्ज माघारी घेण्याची तारीख आहे. त्यामुळे अरुण दळवी की अनिल कोकीळ माघार कोण घेणार? याकडे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून प्रभाग क्रमांक 204 मधून गणेश गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आणि ठाकरेंचे शाखाप्रमुख किरण तावडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने ज्येष्ठ शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला होता. अनिल कोकीळ यांनी दिलेली बॅग आणि साहित्य ज्येष्ठ शिवसैनिकाने जाळलं आहे. गद्दाराला हाकलवून द्या, त्याला कुठेही उभा करू नका असं म्हणत लालबाग येथील ज्येष्ठ शिवसैनिकांकडून संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे आता या प्रभागाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.