BMC Maharashtra Mayor News LIVE : केडीएमसी महापौरपदासाठी अनुसूचित जमातीचं आरक्षण जाहीर

BMC Mumbai Maharashtra Mayor Lottery Announcement News in Marathi : राज्यातील 29 महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी आज आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. मुंबई महानगरपालिकेचा महापौर हा खुल्या प्रवर्गातील असेल. कल्याण-डोंबिवलीत एसटी प्रवर्गाचा महापौर असेल. तर ठाणे एससी, जालना SC महिला आणि लातूर SC- महिलासाठी राखीव असेल.

BMC Maharashtra Mayor News LIVE : केडीएमसी महापौरपदासाठी अनुसूचित जमातीचं आरक्षण जाहीर
Mayor Reservation 1
| Edited By: | Updated on: Feb 09, 2026 | 11:24 AM

मुंबईसह 29 महानगरपालिकांच्या महापौर पदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. मुंबई महानगरपालिकेसाठी सर्वसाधारण गटातील महापौर उमेदवार असेल. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा महापौर हा एसटी प्रवर्गासाठी राखीव झालाय. तर ठाणे महापालिकेसाठी एससी प्रवर्गासाठी महापौर पद राखीव ठेवण्यात आले आहे. मराठवाड्यातील जालना महापौर हा एससी महिला तर लातूर येथील महानगरपालिकेतील महापौर पद हे एससी महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. पनवेल, इचलकरंजी,चंद्रपूर,अकोला अहिल्यानगर,उल्हासनगर, कोल्हापूर,जळगाव साठी ओबीसी सोडत निघाली आहे. तर १७ पैकी ९ ठिकाणी सर्वसाधारण महिला महापौर होतील. सर्व प्रवर्गातील महिलांचं प्रतिनिधित्व पाहता, यंदा राज्यात महिलांना महापौर पदासाठी अधिकचे आरक्षण मिळाल्याचे, प्रतिनिधीत्व मिळाल्याचे समोर येत आहे.

 

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 22 Jan 2026 07:53 PM (IST)

    अब्दुल सत्तार यांचा मुलगा जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात

    अब्दुल सत्तार यांचा मुलगा जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात

    आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव  अब्दुल आमेर सत्तार लढवणार निवडणूक

    आमदार अब्दुल सत्तार यांचा एक मुलगा नगराध्यक्ष, तर आता दुसराही मुलगा लढवणार निवडणूक

    अंबई जिल्हा परिषद सर्कलमधून निवडणुकीच्या रिंगणात

  • 22 Jan 2026 07:50 PM (IST)

    खासदार संदीपान भुमरे यांचा पुतण्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात

    खासदार संदीपान भुमरे यांचा पुतण्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात

    पैठणच्या पाचोड जिल्हा परिषद गटातून लढवणार निवडणूक

    अनेक ठिकाणी नेत्यांनी आपल्या नातेवाईकांनाच निवडणुकीचं  तिकिट दिल्याचं चित्र

    खासदार संदीपान भुमरे यांचे पुतणे शिवराज भुमरे लढवणार निवडणूक

  • 22 Jan 2026 07:30 PM (IST)

    राष्ट्रवादी अजित पवार गट जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर लढणार

    महानगरपालिकेप्रमाणेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक राष्ट्रवादी अजित पवार गट लढवणार स्वबळावर.

    63 पैकी 40 जिल्हा परिषद गट तर 126 पैकी 81 पंचायत समिती गणात दिले उमेदवार

    महानगरपालिकेचा पराभव विसरून जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी युती आघाडीच्या विरोधात राष्ट्रवादी पुन्हा मैदानात

  • 22 Jan 2026 07:15 PM (IST)

    मिरा-भाईंदरमधील ‘रॉयल स्काय स्पा’वर पोलिसांचा छापा, 6 तरुणींची सुटका

    मिरा-भाईंदरमधील ‘रॉयल स्काय स्पा’वर पोलिसांचा छापा, 6 तरुणींची सुटका

    ‘रॉयल स्काय स्पा’वर छापा टाकून 6 जणांना अटक

    डीसीपी राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची कारवाई

    पोलिसांच्या छाप्यानंतर परिसरात खळबळ

     

     

  • 22 Jan 2026 06:55 PM (IST)

    महापालिकेनंतर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपा अजितदादांना घेरणार

    महापालिका निवडणुकीनंतर जिल्हा परिषद निवडणुकीत अजित पवार यांना घेरण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपाने यासाठी रणनिती आखली आहे. भाजपा या निवडणुकीत भ्रष्टाचाराचा मुद्दा काढणार आहे. यासाठी भाजपाने पुणे जिल्हा परिषदेकडून विकासकामांच्या खर्चाची यादी मागवली आहे.

  • 22 Jan 2026 06:43 PM (IST)

    भाजपा आमदार नारायण कुचे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

    भाजपा आमदार नारायण कुचे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. दिवसा पैसे वाटतो गोरगरिबांचं भलं होऊ द्या, असं वादग्रस्त विधान या ऑडिओ क्लिपमध्ये आहे. टीव्ही 9 या क्लिपची पुष्टी करत नाही.

  • 22 Jan 2026 06:22 PM (IST)

    दावोसमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुंतवणुकीबाबत माहिती

    दावोस दौरा यशस्वी झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. या दौऱ्यात उद्योगमंत्री उदय सामंत, एमएमआरडीए, सिडकोचे वरिष्ठ अधिकारी होते. दावोस दौऱ्यामुळे महाराष्ट्रात 30 लाख कोटींची गुंतवणूक झाली आहे. 80 टक्के हे करार हे एफडीआयद्वारे झाले आहेत. 18 देशातून महाराष्ट्रात गुंतवणूक होणार आहे.

  • 22 Jan 2026 06:13 PM (IST)

    एमआयएमच्या नगरसेवक सहर शेख यांच्याविरोधात सोमय्या आक्रमक

    एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेवक सहर शेख यांच्या विधानाची गंभीर दखल सोमय्या यांनी घेतली आहे. मुंब्रा को हरा बनाना है, असं विधान त्यांनी केलं होतं. तर, असं विधान करणं म्हणजे हिंदूंना धमकावणं असं किरीट सोमय्या यांनी म्हंटलं आहे.

  • 22 Jan 2026 06:05 PM (IST)

    केडीएमसी महापौरपदासाठी अनुसूचित जमातीचं आरक्षण जाहीर

    केडीएमसी महापौरपदासाठी अनुसूचित जमातीचं आरक्षण जाहीर झालं आहे. शिवसेनेचे दावेदार रिंगणात असून दोन दिवसांत महापौर होण्याची शक्यता आहे.  महानगरपालिका प्रशासनाकडून महापौर–उपमहापौर कार्यालयांची साफसफाई, रंगरंगोटी कामाला सुरवात झाली आहे. हर्षाली चौधरी की किरण भांगले? शहराचं लक्ष महापौर खुर्चीकडे लागून आहे.

  • 22 Jan 2026 05:49 PM (IST)

    हितेंद्र ठाकूर यांची महापौरपदाच्या आरक्षण सोडतीवर नाराजी

    हितेंद्र ठाकूर यांची महापौरपदाच्या आरक्षण सोडतीवर नाराजी व्यक्त केली आहे. वसई विरार महानगरपालिकेत महापौर पदाचे आरक्षण खुल्या वर्गाला सुटलं आहे. हितेंद्र ठाकूर यांनी महापौरपदाच्या आरक्षण सोडतीवरुन नाराजी व्यक्त केली आहे. आरक्षण सोडतीचा कारभार चुकीचा असून हे नियम विशिष्ट समाजावर अन्याय करणारे आहेत, असा आरोप हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. यावेळी ST महिला आरक्षण पडेल, अशी अपेक्षा होती, मात्र तसे न झाल्याचेही ठाकूर यांनी नमूद केलं.

  • 22 Jan 2026 05:46 PM (IST)

    मुंब्य्रातील MIM नगरसेविका सहर शेख यांना पोलिसांची नोटीस, कारण काय?

    मुंब्य्रातील MIM नगरसेविका सहर शेख यांना पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. पोलिसांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घेतलेल्या भेटीनंतर ही नोटीस पाठवली आहे. सहर शेख यांनी विजयी होताच मुंब्रा हिरवे करून टाकू असे वक्तव्य केले होतं. पोलिसांनी या वक्तव्यामुळे सहर शेख यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 168 नुसार नोटीस दिली आहे.

  • 22 Jan 2026 05:28 PM (IST)

    संजय राऊत यांना मालेगाव अप्पर न्यायालयाचा दणका

    ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना मालेगाव अपर न्यायालयाने दणका दिला आहे. मालेगाव अप्पर न्यायालयाने संजय राऊत यांना 1 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. संजय राऊत तारखेला अनुपस्थित राहिल्याने दंड ठोठावण्याचा आदेश न्यायालयाने दिला. मंत्री दादा भुसे यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या दाव्यात हा दंड ठोठावण्यात आला.

    संजय राऊत आणि त्यांचे वकीलही गैरहजर राहिल्याने न्यायालयाने हा निर्णय सुनावला. न्यायालयाने दंड वसुलीचा आदेश दिला आहे. आता या प्रकरणात पुढील सुनावणी 31 जानेवारीला होणार आहे.

  • 22 Jan 2026 05:06 PM (IST)

    राष्ट्रवादी काका गटाच्या पुरस्कृत अपक्ष उमेदवार प्रमिला केणी यांचा शिवसेनेला पाठिंबा

    कळव्यातील प्रभाग क्रमांक 23 ब मधून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पुरस्कृत अपक्ष उमेदवार प्रमिला केणी यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का बसला आहे.

    प्रमिला केणी यांच्या मुलाला मंदार केणी यांना शिवसेनेने तिकीट दिलं होतं. त्यामुळे प्रमिला केणी यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. प्रमिला केणी यांनी मनाली पाटील या शिवसेनेच्या महिला उमेदवाराचा पराभव केला होता.

  • 22 Jan 2026 04:59 PM (IST)

    जालना महापालिकेसाठी उद्या गटनेत्याची निवड – कैलास गोरंट्याल

    जालना महापालिकेसाठी भाजपकडून उद्या गटनेता निवडला जाणार असल्याची माहिती माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली आहे. महापौर पद एससी महिलेला सुटल्याने भाजपकडे 4 महिला नगरसेवक असल्याने महापौर कोण होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

     

  • 22 Jan 2026 03:48 PM (IST)

    शिंदे गटाचे नेते आणि संदीप देशपांडे यांची गळाभेट, कोकण भवनासमोर काय घडलं?

    शिंदे गटाचे उपनेते विजय चोघुले आणि मनसे नेते संदीप देशपांडे तसेच गजानन काळे यांनी कोकणभवन याठिकाणी समोरासमोर गळाभेट केली आहे

  • 22 Jan 2026 03:37 PM (IST)

    रायगडमध्ये जिल्हा परिषदेसाठी भाजपात बंडखोरी

    रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी काल मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल झाले असले, तरी भाजपमध्ये ‘ कभी खुशी कभी गम असं चित्र पाहायला मिळत आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ आणि पंचायत समितीचे ११८ उमेदवारांनी आज आपल्या पक्षाच्या एबी फॉर्मवर अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मात्र, याचवेळी भाजपमध्ये काही ठिकाणी बंडखोरीचं चित्रही समोर आलं आहे.

  • 22 Jan 2026 03:10 PM (IST)

    येवला तालुक्यात विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात

    नाशिक : येवला तालुक्यात विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात झाली आहे. कमी पाण्यात शेती पिके वाचवण्यासाठी तुषार सिंचनाचा शेतकरी आधार घेत आहेत. पालखेड डाव्या कालव्याच्या वितरिकांनी पाणी सोडण्याची शेतकरी मागणी करत आहेत.

  • 22 Jan 2026 02:25 PM (IST)

    जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण

    जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याचे दर 3 हजार 500 रुपयांनी तर चांदीचे दर 15 हजार रुपयांनी घसरले आहेत. सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 56 हजार 45 हजार रुपयांवर तर 3 लाख 17 हजार 240 रुपयांवर पोहचले आहेत.  गेल्या चार दिवसांपासून सोन्याने चांदीच्या दरामध्ये मोठी तेजी आली होती. मात्र मात्र आज दरात घसरण झाल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

  • 22 Jan 2026 01:49 PM (IST)

    …त्यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही- नवनीत राणा

    पूर्ण मुंब्रा हिरवा करू असं वक्तव्य करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवीका सहर शेख यांच्या वक्तव्यावर नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुणी कितीही म्हटलं की हिरवा करू पण त्यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या विचाराचे रक्त घेऊन आम्ही काम करतो. या देशातून भगवा कोणीच हटवू शकत नाही अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिली आहे.

  • 22 Jan 2026 01:37 PM (IST)

    संभाजीनगरचा महापौर कोण होणार? भागवत कराडांनी थेट सांगितलं…

    छत्रपती संभाजीनगर मनपा आरक्षण आज सुटल्यानंतर भाजपा खासदार भागवत कराड यांनी प्रतिक्रिया दिली. छत्रपती संभाजीनगर महापालिका महापौर कोण होईल याचा निर्णय वरिष्ठांना विचारून केला जाईल असं त्यांनी म्हटलं आहे.

  • 22 Jan 2026 12:58 PM (IST)

    आरक्षण सोडत कायद्यानुसार परंपरेनुसार-आशिष शेलार

    आरक्षणाच्या सोडत हा प्रक्रियेचा भाग असतो आरक्षण सोडत कायद्यानुसार परंपरेनुसार झालेले आहे अशी प्रतिक्रिया भाजप नेते आशिष शेलार यांनी दिली.मुंबईमध्ये माहितीचा महापौर बसेल. मुंबईकरांच्या आशीर्वादाने आणि वाजत गाजत मिरवणुकीसहित बसेल असा दावा त्यांनी केला. आमची कोणतीही अडचण नाही आमच्या महायुतीमध्ये देखील कोणती अडचण नाही लोच्या असेल तर संजय राऊत यांच्या बौद्धिक आणि राजकीय पातळीत लोचा आहे असा टोला शेलार यांनी लगावला.

  • 22 Jan 2026 12:54 PM (IST)

    नाशिकसाठी चांगला उमेदवार देऊ-गिरीश महाजन

    आज आरक्षण सोडत झाली. नाशिकला खुला प्रवर्ग मिळाला आहे. आमच्याकडे सगळीकडे उमेदवार आहेत महायुतीचे भाजपचे नगरसेवक निवडून आले आहेत. स्पर्धा सगळीकडे आहे.ओबीसी आरक्षण निघाल्यामुळे मोठा प्रवर्ग असतो. नाशिकला आता खुला प्रवर्ग आहे त्यामुळे चांगला उमेदवार आम्ही देऊ. महिला पुरुष कोणी असू शकते.आम्ही सगळे निर्णय घेऊ सगळी नावे आमच्या समोर आहे. आम्ही चांगला चेहरा नाशिकला देऊ असे मंत्री गिरीश महाजन म्हणाले.

  • 22 Jan 2026 12:49 PM (IST)

    ठाकरेंच्या शिवसेनेकडून सोडतीवर बहिष्कार

    उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून महापौर आरक्षण सोडतीवर बहिष्कार घातला. ओबीसी प्रवर्गातील महिलांवर अन्याय केल्याचा आरोप माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला. तर तक्रारी नोंदवून घेण्यात येईल असे मंत्री मिसाळ यांनी स्पष्ट केले.

  • 22 Jan 2026 12:45 PM (IST)

    15 महापालिकेवर महिला राज

    राज्यातील २९ महानगरपालिकेत ५० टक्के आरक्षणाचा नियम लागू केल्याने राज्यातील १५ महापालिकांवर महिला राज असणार आहे. तर १४ ठिकाणी सर्वसाधारण वर्गाला संधी मिळणार आहे. ४ महापालिकांमध्ये ओबीसी महिला, तर ९ महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण लागू होईल.

  • 22 Jan 2026 12:43 PM (IST)

    राज्यातील 29 महापौरपदांसाठी आरक्षण सोडत

    राज्यातील महापालिकेतील महापौर आरक्षणाची सोडत

    कल्याण डोंबिवली – एसटी

    ठाणे – एससी

    जालना – एससी महिला

    लातूर – एससी महिला

    पनवेल – ओबीसी

    इचलकरंजी – ओबीसी

    चंद्रपूर – ओबीसी महिला

    जळगाव – ओबीसी महिला

    अकोला – ओबीसी महिला

    अहिल्यानगर – ओबीसी महिला

    उल्हासनगर – ओबीसी

    कोल्हापूर – ओबीसी

    अकोला – ओबीसी महिला

    चंद्रपूर – ओबीसी महिला

    अमरावती – खुला वर्ग

    नागपूर – खुला

  • 22 Jan 2026 12:35 PM (IST)

    राज्यातील 29 महापौरपदांसाठी आरक्षण

    अनुसूचित जमाती १

    अनुसूचित जाती ३

    नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी ८

    सर्वसाधारण १७

     

  • 22 Jan 2026 12:31 PM (IST)

    १७ पैकी ९ ठिकाणी सर्वसाधारण महिला महापौर पद

    १७ पैकी ९ ठिकाणी खुल्या प्रवर्गातील महिला महापौर विराजमान होईल. सगळ्यांचं लक्ष लागलेली मुंबई महापालिकेसाठी खुल्या प्रवर्गातील आरक्षण सोडतीत निघाले. त्यामुळे भाजप आणि शिंदेसेनेचा जीव भांड्यात पडला. त्यामुळे राज्यातील महापौर पदासाठी महिलांना अधिक प्रतिनिधित्व मिळाल्याचे दिसून येते.

  • 22 Jan 2026 12:24 PM (IST)

    अकोला-अहिल्यानगर, जळगाव, चंद्रपूरमध्ये ओबीसी महिला महापौर

    राज्यातील आठ महापालिकांमध्ये चार ठिकाणी ओबीसी महापौर असेल. पनवेल, इचलकरंजी,चंद्रपूर,अकोला अहिल्यानगर,उल्हासनगर, कोल्हापूर,जळगाव महापौर पदासाठी ओबीसी सोडत निघाली आहे. तर अकोला अहिल्यानगर, जळगाव, चंद्रपूरमध्ये ओबीसी महिला महपौर असेल.

  • 22 Jan 2026 12:18 PM (IST)

    जालना SC, लातूर SC- महिलासाठी राखीव

    राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौर पद आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. मराठवाड्यातील जालना महापौर हा एससी महिला तर लातूर येथील महानगरपालिकेतील महापौर पद हे एससी महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.

  • 22 Jan 2026 12:11 PM (IST)

    कल्याण-डोंबिवलीत महापौर पदाचा दावा संपुष्टात

    कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा महापौर हा एसटी प्रवर्गासाठी राखीव असल्याने भाजपचा दावा संपला आहे. भाजपकडे एकही ST उमेदवार नाही. त्यामुळे महापौर पदासाठी त्यांच्याकडे एकही नगरसेवक नाही. तर ठाणे महापालिकेसाठी एससी प्रवर्गासाठी महापौर पद राखीव ठेवण्यात आले आहे.

  • 22 Jan 2026 12:07 PM (IST)

    सोडत पद्धतीवर ठाकरेसेनेचा आक्षेप

    २९ महानगरपालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत मंत्रालयात जाहीर झाली. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत ही सोडत प्रक्रिया पार पडली. तर सोडत पद्धतीवर ठाकरे सेनेने आक्षेप नोंदवला आहे.

  • 22 Jan 2026 11:59 AM (IST)

    पहिली सोडत ही एसटी प्रवर्गासाठी

    राज्यातील २९ महानगरापलिका महापौर पदाच्या आरक्षण सोडतीला सुरुवात झाली आहे. ही सोडत अगोदर होत असते. पण यंदा ही सोडत प्रक्रिया निवडणुकीनंतर होत आहे. कल्याण-डोंबिवली एसटी प्रवर्गासाठी सोडत जाहीर झाली आहे. महापौर पद हे एसटी प्रवर्गासाठी राखीव असेल.

  • 22 Jan 2026 11:55 AM (IST)

    संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीसाठी ‘शिवतीर्थ’वर

    KDMC बाबत झालेल्या निर्णयानंतर संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीसाठी गेले आहेत. या भेटीदरम्यान राऊत कल्याण-डोंबिवलीतील घडामोडींबाबत चर्चा करणार आहेत. केडीएमसीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला मनसेनं पाठिंबा दिला आहे.

  • 22 Jan 2026 11:45 AM (IST)

    राजकारणात काहीही घडू शकतं, बाळा नांदगावकर यांचं सूचक विधान

    स्थानिक पातळीवर कल्याण डोंबिवलीचा निर्णय घेण्यात आला. कुठे कोणते निर्णय घ्यायचे यासाठी ठाकरे बंधू मुरलेले आहेत. मुंबईमध्ये काय होऊ शकतं हे मी आता सांगू शकत नाही. कारण स्थानिक पातळीवर कुठे काहीही होतं. तुम्ही चंद्रपूरमध्ये बघा काय झालं, कोकणात बघा काय झालं? ज्या प्रकारे कल्याण डोंबिवलीमध्ये झालं त्यावर पक्ष कारवाई करू शकतो त्या संदर्भातील निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया बाळा नांदगावकर यांनी दिली.

  • 22 Jan 2026 11:36 AM (IST)

    राज्यातील 29 महापालिकांसाठी आरक्षण सोडत

    राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या महापौरपदांचं आरक्षण निश्चित करण्यासाठी मंत्रालयात सोडत काढली जाणार आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत काढली जाणार आहे. आरक्षण निश्चित झाल्यानंतर विविध महानगरपालिकामधे महापौर निवडीची प्रक्रिया सुरू होईल. वाचा सविस्तर..

  • 22 Jan 2026 11:30 AM (IST)

    कल्याण डोंबिवलीत ठाकरे गटाची महत्त्वाची पत्रकार परिषद

    कल्याण डोंबिवलीत ठाकरे गटाचे 11 नगरसेवक विजयी झाले असून यापैकी चार नगरसेवक नॉट रिचेबल आहेत. सात जणांचा गट स्थापित करत काल सर्वच नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. मात्र कल्याण डोंबिवलीतून मनसेने शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर कल्याण मुंबई ठाकरे गट काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ठाकरे गट आपली भूमिका मांडणार आहे. पत्रकार परिषदेसाठी डोंबिवलीचे जिल्हाध्यक्ष तात्या माने, कल्याण पूर्वेचे जिल्हाप्रमुख शरद पाटील आणि पश्चिमेचे जिल्हाप्रमुख कल्पेश भोईर उपस्थित राहणार आहेत.

  • 22 Jan 2026 11:20 AM (IST)

    अमरावतीच्या अचलपूर नगरपरिषदमध्ये भाजप आणि एमआयएमची युती

    अमरावतीच्या अचलपूर नगरपरिषदमध्ये भाजप आणि एमआयएमची युती झाली आहे. समितीच्या सभापती पदासाठी भाजप आणि एमआयएमने एकमेकांना साथ दिली आहे. तर एमआयएमच्या 3, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 2 आणि तीन अपक्ष नगरसेवकांचा गट भाजपासोबत आहे. अचलपूरमध्ये भाजप आणि एमआयएमसोबत आल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

  • 22 Jan 2026 11:10 AM (IST)

    कल्याण डोंबिवलीत राजकीय चर्चांना उधाण; भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांची फेसबुक पोस्ट व्हायरल

    कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणूक निकालानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिंदे गटाला मनसेकडून मिळालेल्या पाठिंब्यानंतर राजकीय समीकरणे बदलताना दिसत असतानाच, भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांची एक फेसबुक पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.

    नंदू परब यांनी केलेल्या या फेसबुक पोस्टमध्ये एक योद्धा धारातिर्थी पडलेला दिसत असून, त्याच्या पाठीत अनेक बाण रोवलेले असल्याचे चित्र आहे. या चित्रासोबत लिहिलेला मचकूरही सूचक असून, त्यातून थेट कोणाचेही नाव घेतलेले नाही. मात्र, कल्याण-डोंबिवलीच्या जनतेने याचा संबंध भाजपशी लावू नये,असा उल्लेख केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

  • 22 Jan 2026 10:57 AM (IST)

    धुळे महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता, पण विरोधी पक्षनेते पदासाठी रणसंग्राम

    धुळे महानगरपालिकेत ५० जागांसह भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळवले असले, तरी आता विरोधी पक्षनेते पद कोणाकडे जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. १० जागा जिंकणाऱ्या एमआयएमने (MIM) दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष म्हणून या पदावर दावा ठोकला आहे. मात्र, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) माजी आमदार फारुक शहा यांनी हे पद राष्ट्रवादीलाच मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीचे ८ आणि शिवसेनेचे ५ असे एकूण १३ नगरसेवक सोबत असल्याने आमचे संख्याबळ जास्त आहे, असा युक्तिवाद शहा यांनी केला आहे. यामुळे महापालिकेत आता एमआयएम विरुद्ध राष्ट्रवादी असा नवा राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे.

  • 22 Jan 2026 10:53 AM (IST)

    भाजपचे माजी महापौर जयश्री महाजन यांच्या कारचा भीषण अपघात

    जळगावच्या माजी महापौर जयश्री महाजन आणि नगरसेवक सुनील महाजन यांच्या कारला मालेगावजवळ भीषण अपघात झाला. नाशिक येथे भाजपची संघटनात्मक बैठक आटोपून जळगावकडे परतत असताना हा अपघात घडला. समोरील वाहनाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे महाजन यांची कार त्यावर जाऊन आदळली. या धडकेत कारच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. मात्र, कारमधील सर्वांनी सीट बेल्ट लावलेले असल्याने आणि चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला. जयश्री महाजन, सुनील महाजन आणि इतर तिघे जण या अपघातातून बालंबाल बचावले असून कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.

  • 22 Jan 2026 10:43 AM (IST)

    ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर टॅम्पो उलटला; 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा

    मुंबईच्या पूर्व द्रुतगती महामार्गावर आज भल्या पहाटे एक टॅम्पो उलटल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या अपघातामुळे मुलुंड ते कांजूरमार्ग दरम्यान येणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. महामार्गावर सुमारे ३ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. सकाळी कामावर निघणाऱ्या चाकरमान्यांना या कोंडीचा मोठा फटका बसला आहे. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त टँपो बाजूला सारून रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू आहे.

  • 22 Jan 2026 10:33 AM (IST)

    मुंबईच्या महापौर पदावरून युतीत पेच; शिवसेना अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर ठाम

    मुंबई महापालिकेत सर्वाधिक ८९ जागा जिंकून भाजप मोठा पक्ष ठरला असला, तरी महापौर पदासाठी शिवसेनेने (शिंदे गट) आक्रमक पवित्रा घेतला आहे. २३ जानेवारीपासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जयंती वर्ष सुरू होत आहे, याचेच औचित्य साधून मुंबईचा महापौर शिवसेनेचाच व्हावा, अशी मागणी माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे. शिवसेनेने ‘अडीच-अडीच वर्षे’ महापौर पद वाटून घेण्याचा प्रस्ताव मांडला आहे. याच मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि राहुल शेवाळे यांच्यात दिल्लीत चर्चा सुरू असून, आता भाजप शिवसेनेची ही मागणी मान्य करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • 22 Jan 2026 10:23 AM (IST)

    पुण्यात राजकीय राडा, शिवसेना पदाधिकाऱ्यावर हल्ला

    पुण्यातील हडपसर परिसरात राजकीय वादातून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात संघर्ष पाहायला मिळाला. शिवसेना उपसंघटक दीपक कुलाळ यांच्यावर राष्ट्रवादीचे पदाधिकारी उल्हास तुपे यांनी दगडाने हल्ला केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या हल्ल्यात कुलाळ जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हडपसर पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून, जखमी कुलाळ यांचा जबाब नोंदवल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • 22 Jan 2026 10:11 AM (IST)

    येवला तालुक्यात जानेवारीतच पाणीटंचाईचे चटके, विहिरींनी गाठला तळ

    नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात जानेवारी महिना संपण्यापूर्वीच पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. अनेक गावांमधील विहिरींची पाणीपातळी खालावल्याने उभ्या पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांची मोठी ओढाताण होत आहे. पाण्याची कमतरता असल्याने शेतकरी तुषार सिंचनाचा आधार घेत आहेत, मात्र तरीही पाणी वेळेवर मिळत नसल्याने कांद्याची रोपे जळू लागली असून शेतात मोठ्या भेगा पडल्या आहेत. यामुळे कांदा उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पिके वाचवण्यासाठी पालखेड डाव्या कालव्याच्या आवर्तनाचे पाणी तातडीने वितरिकांमध्ये सोडण्यात यावे, अशी आर्त हाक आता येवल्यातील शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिली आहे.

  • 22 Jan 2026 10:05 AM (IST)

    बीडमध्ये ऑनलाईन बेटिंगवर कारवाई, १६ तासांनंतर गुन्हा दाखल, पण आरोपींना काही मिनिटांतच सोडले!

    बीडच्या नेकनूर पोलीस स्टेशन हद्दीतील कारेगव्हाण परिसरात दोन पोलीस कॉन्स्टेबलने रात्रीच्या सुमारास मोठी कारवाई करत ऑनलाईन बेटिंगचे रॅकेट उघडकीस आणले. या कारवाईत ४ आरोपींकडून ११ मोबाईल, २ लॅपटॉप आणि करोडो रुपयांचे आर्थिक व्यवहार आढळून आले. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास प्रशासनाला १६ तास लागले आणि गुन्हा दाखल होताच अवघ्या काही मिनिटांत आरोपींना नोटीस बजावून सोडून देण्यात आले. पोलिसांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला असला तरी, तांत्रिक कारणास्तव आरोपींना न्यायालयात हजर करता येत नसल्याचे समर्थन दिले आहे. या प्रकरणातील पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेमुळे आता संपूर्ण जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे.

  • 22 Jan 2026 09:50 AM (IST)

    शनिवारवाड्याबाहेर रांगोळी घालत दिल्ली दरवाजाला फुलाची सजावट

    शनिवारवाड्याबाहेर रांगोळी घालत दिल्ली दरवाजाला फुलाची सजावट करण्यात आली आहे.थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे शनिवारवाड्याचा वर्धापनदिन समारंभ आयोजित करण्यात आलाय. मराठी साम्राज्याचा सुवर्णकाळ पाहिलेल्या शनिवारवाड्याचा आज २९४ वा वर्धापनदिन मोठ्या थाटात साजरा करण्यात येतोय.

  • 22 Jan 2026 09:40 AM (IST)

    दीपक कुलाळ याच्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याने हल्ला

    पुण्यातील हडपसरमध्ये शिवसेना (शिंदे ) गटाच्या उपसंघटक दीपक कुलाळ याच्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याने हल्ला केल्याचा आरोप… राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी उल्हास तुपे यांनी दीपक कुल्लाळ यांच्यावर दगडाने हल्ला केल्याचा आरोप…दीपक कुलाळ यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असून, त्यांचं जबाब घेतल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती हडपसर पोलिसांनी दिलीय.

  • 22 Jan 2026 09:30 AM (IST)

    मुंबई महापालिकेतील महापौर पदावरून राजकीय घडामोडींना वेग

    मुंबई महापालिकेत सर्वाधिक ८९ जागा जिंकलेल्या भाजपाने महापौर पदावर दावा कायम ठेवला आहे.मात्र २१ नगरसेवकांच्या जोरावर शिवसेना महापौर पदासाठी आग्रही असल्याचे चित्र आहे. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ही मागणी मान्य करावी, अशी अपेक्षा शिवसेनेकडून व्यक्त केली जात आहे.

     

  • 22 Jan 2026 09:20 AM (IST)

    मुंबईच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर टॅंपो पटली झाल्यानं हायवेवर वाहनांच्या तीन किलोमीटर लांब रांगा

    मुलूंडपासून कांजूरमार्ग या येणारी वाहतूक बाधीत. भल्या पहाटे अपघात झाल्याने वाहतूक कोंडींचा चाकरमान्यांना फटका. ट्रॅफिक विभागाकडून क्रेन मागवून टॅंपो हटवण्याचे काम सुरू

  • 22 Jan 2026 09:05 AM (IST)

    भाजपच्या बंडखोरांमुळे शिवसेनेचे 10 उमेदवार पडले, मोठा वादा

    शिवसेनेने जागा वाटपात जास्त जागा घेतल्यामुळे भाजपच्या नगरसेवकांची. संख्या कमी झाली असली असा दावा भाजपच्या पदाधिकार्‍यांकडून केला जात असला तरी भाजपच्या बंडखोरांमुळे शिवसेनेच्या 10 उमेदवारांच्या पदरी पराभव
    आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीवरून हाती आली आहे.

  • 22 Jan 2026 09:04 AM (IST)

    मनसे नेते संदीप देशपांडे यांची 10 वाजता पत्रकार परिषद…

    राज्यातील 29 महापालिकांच्या महापाैर पदाची आज सोडत असून आरक्षण जाहीर होईल. त्यापूर्वी राजकीय घडामोडींना वेग येत असून मनसे नेते संदीप देशपांडे यांची दहा वाजता पत्रकार परिषद आहे.

  • 22 Jan 2026 09:00 AM (IST)

    BJP Mayor : सुदैवाने भाजपच्या माजी महापौर भीषण अपघातातून बचावल्या

    मालेगावजवळ जळगावातील भाजपच्या माजी महापौर जयश्री महाजन आणि नगरसेवक सुनील महाजन या दाम्पत्याच्या कारचा अपघात. सुदैवाने चालकाच्या प्रसंगावधानामुळे महाजन दाम्पत्यासह कारमधील सर्वजण बालबाल बचावले. मात्र कारच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चुराडा झाला. समोरील वाहनाने अचानक गतिरोधकामुळे ब्रेक दाबला. त्यामुळे मागून येणारी महाजन यांची कार थेट समोरील वाहनावर आदळल्याने हा अपघात झाला.

  • 22 Jan 2026 08:54 AM (IST)

    BMC Election 2026 : भाजपच्या बंडखोरांमुळे मुंबईत शिवसेनेचे 10 उमेदवार पडले

    शिवसेनेने जागा वाटपात जास्त जागा घेतल्यामुळे भाजपच्या नगरसेवकांची संख्या कमी झाली असली असा दावा भाजपच्या पदाधिकार्‍यांकडून केला जात आहे. पण भाजपच्या बंडखोरांमुळे शिवसेनेच्या 10 उमेदवारांच्या पदरी पराभव आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीवरून हाती आली आहे.

  • 22 Jan 2026 08:45 AM (IST)

    BMC Maharashtra Mayor : मुंबई महापालिकेतील महापौर पदावरून राजकीय घडामोडींना वेग

    मुंबई महापालिकेत सर्वाधिक 89 जागा जिंकलेल्या भाजपने महापौर पदावर दावा कायम ठेवला आहे. मात्र 29 नगरसेवकांच्या जोरावर शिवसेना महापौर पदासाठी आग्रही असल्याचे चित्र आहे. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ही मागणी मान्य करावी, अशी अपेक्षा शिवसेनेकडून व्यक्त केली जात आहे. या मुद्द्यावर मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि शिवसेनेचे सरचिटणीस, माजी खासदार राहुल शेवाळे यांच्यात दिल्लीत चर्चा सुरू आहे.

  • 22 Jan 2026 08:35 AM (IST)

    Maharashtra Nagpur Mayor : नागपुरात भाजपने किती जागा जिंकल्या?

    नागपूर महानगरपालिकेत भाजपने एक हाती सत्ता मिळवत 102 जागांवर विजय मिळविला आहे. त्यामुळे महापौर हा नागपुरात भाजपचाच होणार. मात्र तो कोण्या प्रवर्गातून होणार आणि त्यासाठी दावेदार कोण? याकडे आता संपूर्ण नागपूरचे लक्ष लागले आहे. महापौर पदाची सोडत कशी काढली जाते, त्यानुसार महापौर पदाचे आरक्षण निघणार आहे. महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असून ते महापौर बिनविरोध होण्यास पुरेसे आहे. परंतु महापौर पदासाठी काँग्रेसकडून उमेदवार देण्याची शक्यता सुद्धा नाकरता येत नाहीय.

  • 22 Jan 2026 08:25 AM (IST)

    BMC Maharashtra Mayor : महापौरपदामध्ये महिलांसाठी किती टक्के आरक्षण

    महिलांसाठी 50 टक्के आरक्षण लागू. आरक्षण चक्राकार पद्धतीने काढले जाणार. 2011 च्या जनगणनेच्या आधारे आरक्षण निश्चित.  मुंबई, नवी मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवलीसह अनेक महापालिकांचा समावेश. पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर, सांगली आदी महापालिकांसाठी आरक्षण जाहीर. सोडतीनंतर कोणती महापालिका आरक्षित आहे की खुली, हे स्पष्ट होणार.

  • 22 Jan 2026 08:23 AM (IST)

    BMC Maharashtra Mayor : सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळातील परिषद सभागृहात सोडत निघणार

    राज्यातील महापालिकांसाठी महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत आज जाहीर होणार. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात सोडत प्रक्रिया. सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळातील परिषद सभागृहात सोडत निघणार. महापौर पदाच्या पहिल्या अडीच वर्षांच्या कालावधीसाठी आरक्षण निश्चित. अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींसाठी प्रथम आरक्षण जाहीर होणार. त्यानंतर नागरिकांच्या मागास प्रवर्ग (OBC) आरक्षणासाठी सोडत निघणार.

  • 22 Jan 2026 08:20 AM (IST)

    BMC Maharashtra Mayor : आज महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघणार

    मुंबईसह 29 महानगरपालिकांसाठी मागच्या आठवड्यात निवडणुका झाल्या. निकालानंतर आज महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघणार आहे. सगळ्या राज्याचं लक्ष या महापौरपदाच्या सोडतीकडे लागलं आहे.

Follow Us