VIDEO: फाटक्या माणसासमोर नतमस्तक होईल, पण पदासाठी हात फैलावणार नाही; पंकजा मुंडेंची खदखद उघड

| Updated on: Nov 21, 2021 | 12:22 PM

भाजपने विधान परिषदेच्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यात भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेवर वर्णी लावण्यात आली आहे.

VIDEO: फाटक्या माणसासमोर नतमस्तक होईल, पण पदासाठी हात फैलावणार नाही; पंकजा मुंडेंची खदखद उघड
Pankaja Munde
Follow us on

बुलडाणा: भाजपने विधान परिषदेच्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यात भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेवर वर्णी लावण्यात आली आहे. मात्र, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा तिकीट नाकारण्यात आलं आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या मनातील खदखद पुन्हा एकदा समोर आली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड येथे माजी आमदार तोताराम कायंदे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यता आला होता. यावेळी पंकजा मुंडे यांची खदखद समोर आल्याचं पाहायला मिळालं. माझे माता-पिता माझे सर्वस्व तुम्ही आहात. तुम्हाला दहा परिक्रमा करेल, मला अजून कुठल्या परिक्रमेची आवश्यकता नाही. एखाद्या गरीब फाटक्या माणसाच्या पायावर डोकं ठेवून नतमस्तक होईल. पण कुणासमोर हात फैलावून कुठल्या पदाची मागणी करण्याची आमच्या रक्तात सवय नाहीये. एखादी संधी नाही मिळाली तर नाही. पण लोकांच्या सेवेची संधी सोडायची नाही ही शपथ गोपीनाथ मुंडे साहेबांना अग्नि देताना घेतली आहे. मी तुम्हाला कधीच अंतर देणार नाही, अशी खदखद पंकजा यांनी व्यक्त केली.

पुन्हा तिकीट कापलं

भाजपने दोन दिवसांपूर्वीच विधान परिषदेच्या उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यानुसार अमल महाडिक, अमरिश पटेल, चंद्रशेखर बावनकुळे, वसंत खंडेलवाल आणि राजहंस सिंह यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यावेळी विधान परिषदेवर पंकजा मुंडे यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा होती. मात्र, पक्षश्रेष्ठींनी पंकजा यांना यावेळीही विधान परिषदेची संधी दिली नाही. तर विधानसभेचं तिकीट कापण्यात आलेल्या बावनकुळेंना मात्र ही संधी देण्यात आली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी मनातील खदखद व्यक्त करतानाच पक्षश्रेष्ठींना अप्रत्यक्ष टोले लगावल्याचं सांगितलं जात आहे.

बावनकुळेंना संयमाचं फळ?

दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांना संयमाचं फळ मिळाल्याचं सांगितलं जात आहे. विधानसभेला तिकीट कापल्यानंतरही बावनकुळे यांनी कोणतीही खळखळ केली नव्हती. त्यांनी पक्षावर टीका केली नव्हती. उलट पक्षाचा निर्णय मान्य असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. स्वत:चं तिकीट कापलेलं असतानाही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचाराची धुरा समर्थपणे सांभाळली होती. शिवाय ओबीसी आरक्षणाचा प्रश्न असो की वीज शुल्क माफीचा प्रश्न असो त्यांनी प्रत्येक मुद्द्यावर आंदोलन करत सरकारला घेरलं होतं. विदर्भात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपला मोठा पराभव पत्करावा लागला होता. बावनकुळे यांना तिकीट नाकारल्याने ओबीसी मतदारांनी भाजपकडे पाठ फिरवल्याचं दिसून आलं होतं. त्याची पक्षाने दखल घेत तिकीट कापल्यानंतरही संयम दाखवणाऱ्या बावनकुळेंना विधान परिषदेची उमदेवारी दिल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

तर, या उलट विधानसभेत पराभव झाल्यापासून पंकजा मुंडे यांनी पक्षावर हल्लाबोल सुरू केला आहे. पंकजा यांना विधान परिषद नाकारण्यात आली. प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं नाही. त्यामुळे पंकजा यांनी पक्षावर हल्ला चढवला होता. त्यामुळेच पंकजा यांचा यावेळीही पत्ता कापण्यात आल्याचं बोललं जात आहे.

संबंधित बातम्या:

VIDEO: एअर इंडिया विकणाऱ्या आणि रेल्वे विकायला निघालेल्यांनी एसटीवर बोलू नये; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल

वेळेआधी पोहोचूनही प्रवेश नाकारल्याचा आरोप, कोल्हापूरमध्ये TET परीक्षा केंद्रावर गोंधळ, धुळ्यात खासदारांच्या प्रयत्नानं विद्यार्थ्यांना प्रवेश

आमचं सरकार होत तेव्हाही विलिनीकरण कुठे झालं..? रोडवर एक आणि आत गेल्यावर वेगळं असतं, जनतेनं हुशार व्हावं : महादेव जानकर