Railway News: प्रवाशांनी लक्ष द्या! मुंबईत 5 स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद; कुणाला मिळणार सवलत?
दिवाळीसोबतच उत्तर भारतातील मोठा सण असलेल्या छठपुजेसाठीही परप्रांतीय आपापल्या गावी परतत आहेत. दिवाळी तसेच छठपुजेनिमित्त प्रवाशांची होणारी गर्दी नियंत्रित करण्यासाठी मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे.

Central Railway Platform Ticket Rule: देशभरात दिवाळीची धामधूम सुरु झाली असून सणाला गावी जाण्यासाठी मुंबईमधील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दिवाळीसोबतच उत्तर भारतातील मोठा सण असलेल्या छठपुजेसाठीही परप्रांतीय आपापल्या गावी परतत आहेत. दिवाळी तसेच छठपुजेनिमित्त प्रवाशांची होणारी गर्दी नियंत्रित करण्यासाठी मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने मुंबईमधील मुख्य रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद केली आहे. कोणती आहेत ती स्थानके अन् ही तिकीटविक्री कधीपर्यंत बंद राहणार आहेत? जाणून घ्या सविस्तर…
कोणत्या 5 स्थानकांवर तिकीट विक्री बंद राहणार?
मध्य रेल्वेच्या निर्णयानुसार, मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर स्टेशन, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे स्टेशन आणि कल्याण स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकीटविक्री बंद राहणार आहे. पाच नोव्हेंबरपासून 15 नोव्हेंबरपर्यंत ही तिकीट विक्री बंद राहणार असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. या काळामध्ये फक्त अधिकृत रेल्वे तिकीट असणाऱ्या प्रवाशांनाच प्लॅटफॉर्मवर एन्ट्री देण्यात येणार आहे.
कोणाला मिळणार सवलत?
मात्र, सुरक्षेच्या कारणामुळे हा कडक नियम केला असला तरी काही गरजू प्रवाशांच्या मदतीसाठी येणाऱ्या नातेवाईकांना यामधून सुट देण्यात येईल असेही रेल्वेने स्पष्ट केले आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना सोडायला तसेच घ्यायला येणाऱ्या नातेवाईकांना, आजारी प्रवाशांच्या मदतीला येणाऱे नातेवाईक, छोट्या मुलांसोबत प्रवास करणारे नातेवाईक तसेच महिला प्रवाशांसोबत येणारे नातेवाईक यांना यामध्ये सूट देण्यात देणार आहे.
मध्य रेल्वेचे प्रवाशांना आवाहन!
दरम्यान, दिवाळी तसेच छठपुजेसाठी मुंबईत राहणारे नागरिक गावाकडे जातात. यामुळे उत्तर भारत, बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी असते. अशावेळी प्लॅटफॉर्मवर केवळ प्रवास करणारे प्रवाशीच उपस्थित राहतील आणि चेंगराचेंगरी किंवा इतर कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. प्रवाशांनी आपल्या ट्रेनच्या वेळेत रेल्वे स्थानकावर पोहोचावे आणि गैरसोय टाळण्यासाठी दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहनही रेल्वेने केले आहे.
