पुणे मेट्रो रेल प्रकल्प फेज-2 मध्ये 13 नवीन स्थानके, 3626.24 कोटी रुपयांना केंद्राची मंजूरी
पुण्यातील पूर्व-पश्चिम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी चांदणी चौक ते वाघोली पुणे मेट्रो कॉरिडॉरची संकल्पना मांडण्यात आलेली आहे.

केंद्रीय मंत्रीमंडळाने पुण्याच्या मेट्रो रेल प्रकल्प फेज -2 ला मंजूरी दिली आहे. वनाज ते चांदणी चौक ( Corridor 2A ) आणि रामवाडी ते वाघोली-विठ्ठलवाडी (Corridor 2B) या सध्याच्या वनाज – रामवाडी कॉरीडॉर फेज-1 चा विस्तार आहे. या दोन एलिवेटेड कॉरीडॉरची एकूण लांबी 12.75 किमीचा असून त्यात 13 स्थानकांचा समावेश आहे. या मेट्रो मार्गामुळे पुण्यातील चांदणी चौक, बावधन, कोथरूड, खराडी आणि वाघोली उपनगरातील कनेक्टीव्हीटी वाढणार आहे. या प्रकल्पाचे काम चार वर्षांत पूर्ण करण्याची योजना आहे.
या संपूर्ण प्रकल्पाची किंमत 3626.24 कोटी रुपये आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाच्या खर्चाला मंजूरी दिली आहे. या प्रकल्पाची अर्धा खर्च आता राज्य सरकार देणार आहे. मेट्रो मार्गिकांच्या या विस्तारामुळे प्रमुख आयटी हब, व्यावसायिक क्षेत्रे, शैक्षणिक संस्था आणि निवासी क्षेत्रांना कनेक्टीव्हीटी मिळणार आहे.त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन मिळणार आहे.मेट्रो नेटवर्कमधील प्रवाशांची संख्या वाढेल. नवीन कॉरिडॉर जिल्हा न्यायालय इंटरचेंज स्टेशनवर लाईन-1(निगडी-कात्रज) आणि लाईन-3 (हिंजवडी-जिल्हा न्यायालय) सोबत देखील एकत्रित केले जातील जेणेकरून अखंड मल्टीमॉडल शहरी प्रवास शक्य होईल.
येथे पोस्ट पाहा –
#Cabinet approves Pune Metro Rail Project Phase-2: Vanaz to Chandani Chowk (Corridor 2A) & Ramwadi to Wagholi/Vitthalwadi (Corridor 2B), extension of the Existing Pune Metro Phase–I (Vanaz-Ramwadi)
➡️These two elevated corridors will span 12.75 km and include 13 stations,… pic.twitter.com/ByQi3LRpPf
— PIB India (@PIB_India) June 25, 2025
प्रमुख मार्गांवर गर्दी कमी होणार
दीर्घकालीन वाहतूक नियोजनाअंतर्गत, मुंबई आणि बंगळुरू सारख्या शहरांमधून पुणे शहरात येणाऱ्या इंटरसिटी बस सेवा चांदणी चौकात एकत्रित होतील तर अहिल्या नगर आणि छत्रपती संभाजी नगर येथून येणाऱ्या बस सेवा वाघोली येथे एकत्र जोडल्या जातील. ज्यामुळे प्रवाशांना पुण्याच्या मेट्रो सिस्टीममध्ये सहज प्रवेश मिळेल. या विस्तारांमुळे पौड रोड आणि नगर रोडसारख्या प्रमुख मार्गांवर गर्दी कमी होण्यास मदत होईल, ज्यामुळे सुरक्षित, जलद आणि पर्यावरणपूरक वाहतूक पर्याय उपलब्ध होतील.
साल 2057 पर्यंत 3.49 लाख प्रवासी संख्या
या प्रकल्पाच्या पूर्ततेनंतर या मेट्रो मार्गिका लाईन – 2 ची एकूण प्रवासी संख्या साल 2027 पर्यंत 0.96 लाख होईल तर साल 2037 पर्यंत 2.01 लाख, साल 2047 पर्यंत 2.87 लाख आणि साल 2057 पर्यंत 3.49 लाख होणार आहे. या मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड ( महा मेट्रो ) अंतर्गत होत आहे.
