आदल्या रात्रीच ठरला प्लान, आंतरवालीतील दगडफेकीवर भुजबळांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, पवारांचं नाव घेत सगळं सांगितलं

आंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू असताना पोलिसांवर दगडफेक झाल्याची घटना घडली होती, याबाबत बोलताना छगन भुजबळ यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे, त्यामुळे आता चर्चेला उधाण आलं आहे.

आदल्या रात्रीच ठरला प्लान, आंतरवालीतील दगडफेकीवर भुजबळांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, पवारांचं नाव घेत सगळं सांगितलं
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 18, 2025 | 7:36 PM

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आंतरवाली सराटीमध्ये आंदोलन सुरू होतं, या आंदोलनादरम्यान मोठा राडा झाला होता, यावेळी पोलिसांवर देखील दगडफेक झाल्याचा आरोप करण्यात आला होता. यावर बोलताना आता ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

नेमकं काय म्हणाले भुजबळ? 

आतरवली सराटीत 83 पोलिसांवर दगडफेक झाली.  त्यांचा प्लान आदल्या रात्रीच ठरला होता. त्यावेळेस पवार साहेबांचा एक आमदार त्या बैठकीत सहभागी होता.  शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना वस्तुस्थिती माहीत असतानाही, शरद पवार त्या ठिकाणी गेले, असा मोठा गौप्यस्फोट यावेळी भुजबळ यांनी केला आहे, भुजबळ यांच्या या दाव्यामुळे आता चर्चेला उधाण आलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना भुजबळ यांनी काही ओबीसी प्रमाणपत्रं देखील दाखवली, ही प्रमाणपत्र खोटी असल्याचा दावा त्यांनी केला आहे, त्यातील एकावर खाडाखोड झालेली होती, तर एकावर  ‘मराठी कुणबी’ असं लिहीलं होतं. खोटी प्रमाणपत्र तपासण्यासाठी समिती नेमा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की,  शिंदे समितीचं आता काय काम आहे?  शपथपत्राच्या आधारे निर्णय घेणं कुठेही मान्य नाही, संविधानात नाही. एका ताटात दोन जण जेवतात. त्यात मध्येच  तीन चार घुसले तर काय होईल? असा प्रश्न यावेळी भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. निवडणूक आली की जरांगे पाटील उभे राहातात, जे -जे जरांगे यांना समर्थन करतील त्यांना निवडणुकीत धडा शिकवा, तुम्ही एकत्र आला तर काहीही अशक्य नाही.  मी निवडणुकीला उभं राहीलो. जरांगे पाटील दोन दिवस माझ्या मतदार संघात आले.  मराठा मतं गेली. पण ओबीसी, एससी, एसटी, सर्व जाती माझ्या सोबत आल्या,  मी जिंकलो. असंही यावेळी भुजबळ यांनी म्हटलं आहे.  तेली, माळी, धनगर बघू नका ओबीसी म्हणून सर्वजण एकत्र या, असं आवाहनही यावेळी भुजबळ यांनी केलं आहे.