मनोज जरांगेंचं बिल कोण देतं? आमच्याकडे सगळी माहिती…, भुजबळांचा पुन्हा घणाघात

ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे, मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचे नेते नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगेंचं बिल कोण देतं? आमच्याकडे सगळी माहिती..., भुजबळांचा पुन्हा घणाघात
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 07, 2025 | 6:11 PM

राज्यात मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर मराठा विरोधात ओबीसी समाज असं चित्र निर्माण झालं आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं अशी भूमिका ओबीसी समाजाची आहे. ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणावरून आता आक्रमक भूमिका घेतल्याचं पहायला मिळत आहे, त्यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते उगाच बोलतात, ते काही नेता नाहीत, यांना कोणी नेता केलं? असा सवाल यावेळी भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.

नेमकं काय म्हणाले भुजबळ?

या मनसाला एकतर काही येत नाही, टीव्ही चालू झाला की बोलायला सुरुवात करतात. तिकडचे त्यांचे लोक मॅनेज आहेत, कुणबी समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्यास देखील आमचा विरोध नाही, पण त्यांना वेगळं आरक्षण द्यावं. आमच्या सगळ्या रीट याचिका अजूनही जिवंत आहेत, काहीच फेटाळलेले नाही. ते एक मराठा लाख म्हणतात, पण आम्ही ३७४ जाती आहेत. मात्र आपल्याला ओबीसी म्हणून एकत्रित लढाई लढावी लागेल. मी काय माळी संघटना आणि परिषद काढली नाही, मी  समता परिषद काढली आहे,  दलीत आणि आदिवासी  यांच्यासाठी भांडण केले आहे, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले जरांगे पाटील उगाच बोलतात, ते काय नेता आहेत का? त्यांना कोणी केलं नेता?  अरे मला बाळासाहेब ठाकरे यांनी नेता केलं आहे. शिवाजी पार्कवर मला शाखाप्रमुख केले आहे. पण मंडल आयोगामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मतमतांतर झाले, नंतर मी राष्ट्रवादीत आलो. यांना काही माहीत नाही, पहिली पण शिकला आहे की नाही, काय माहीत, असा खोचक टोला यावेळी जरांगे पाटील यांना भुजबळांनी लगावला आहे.

ते सध्या हॉस्पिटलमध्ये आहेत, तुमचं एवढं बिल कोण देते? आमच्याकडे संपूर्ण माहिती आहे.  मला काम आहे,  शेतकऱ्यांबाबत विषय सुरू आहेत, आम्ही शेतकऱ्यांसाठी  ३१ हजार ५०० कोटी दिले,  शेतकऱ्यांसाठी एवढे कोणीच दिले नाही,  कोणत्याच सरकारने दिले नाहीत, असंही यावेळी भुजबळ यांनी म्हटलं आहे.