Khavdya Dongar : कुणाल चांदगुडेची मावशी प्रचंड संतापली, व्हिडिओ पाहून रागात…पल्लवी पाटील यांची हात जोडून विनंती

चांदगुडे कुटुंबाच्या मृत्यू प्रकरणानंतर सोशल मीडियावर विविध अफवा पसरू लागल्या आहेत. यावरून कुणालच्या मावशीने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे.

Khavdya Dongar : कुणाल चांदगुडेची मावशी प्रचंड संतापली, व्हिडिओ पाहून रागात...पल्लवी पाटील यांची हात जोडून विनंती
chandgude family news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Aug 23, 2026 | 6:21 PM

ज्ञानेश्वर लोंढे : छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावर घडलेल्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. एकुलत्या एक मुलाला वाचवताना बापाचा दुर्दैवी मृत्यू झाला. लेक-नवऱ्याचा डोळ्यासमोर अंत पाहून संगीतानेही मृत्यूला कवटाळलं. अवघ्या पाच सेकंदात संपूर्ण चांदगुडे कुटुंबाचा शेवट झाला. आता त्यांच्या घरात फक्त एक पाळीव कुत्रा उरला आहे. चांदगुडे कुटुंबाच्या नातेवाईकांनी त्यांचा अंत्यविधी आणि राख सावडली. आता या प्रकरणी नवनवीन माहिती समोर येत आहे. कुणाल चांदगुडे प्रकरणावरुन सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावरून कुणालची मावशी प्रचंड संतापल्याचं समोर आलं आहे. लोकांनी आता खोट्या अफवा पसरवू नये, अशी विनंती कुणालच्या मावशीने केली आहे.

खवड्या डोंगर प्रकरणात संगीता चांदगुडे, कुणाल चांदगुडे आणि मुरलीधर चांदगुडे यांच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर विविध प्रकारच्या चर्चा आणि अफवा पसरत आहेत. यावर कुणाल चांदगुडे यांची मावशी पल्लवी पाटील यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत खोट्या अफवा पसरवू नका, अशी कळकळीची विनंती केली आहे. पल्लवी पाटील यांनी म्हटलं की, संगीता चांदगुडे या माझ्या मोठ्या बहिणी आहेत. त्यांना, कुणालला आणि मेव्हण्याला गमावल्यानंतर आमची काय परिस्थिती आहे, हे फक्त आम्हालाच माहिती आहे’.

सोशल मीडियावर कुणाला केवळ मोबाईल न मिळाल्यामुळे त्याने आई-वडिलांना या टोकाच्या निर्णयासाठी भाग पाडलं, अशा प्रकारच्या चर्चा सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, सत्य माहिती नसताना अशा खोट्या अफवा पसरवू नका, अशी विनंती त्यांनी केली. आज माझ्या बहिणीची, मेव्हण्याची आणि मुलाची राख सावडून घरी जात आहे. घरी जाताना मोबाईलमध्ये पाहिलं तर एकामागून एक व्हिडिओ दिसत आहेत. आमचं काळीज खाली बसलं आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

तसंच, आम्ही चार बहिणी आहोत. आमच्या आई-वडिलांचे वय 75 वर्षांपेक्षा जास्त आहे. त्यांनी आपल्या पहिल्या लेकराला गमावलं आहे. त्यामुळे त्यांना हा धक्का सहन होणार नाही, असंही पल्लवी पाटील यांनी म्हटलं आहे. कुणाल, संगीता आणि मुरलीधर यांच्याबद्दल कोणतीही माहिती किंवा सत्यता माहीत नसताना सोशल मीडियावर व्हिडिओ बनवून आरोप करू नका. कुठलाही व्हिडिओ बनवण्यापूर्वी विचार करा आणि आमच्या कुटुंबाच्या दुःखाचा विचार करा, अशी भावनिक विनंती पल्लवी पाटील यांनी केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us