सलग 19 तास, 19 मिनिटे, 19 सेकंद दांडपट्टा चालणवार, छत्रपतींना देणार अनोखी मानवंदना
World Record On Shiv Jayanti 2025: दांडपट्टा चालवणाऱ्या सात मावळ्यांमध्ये मुस्लीम खेळाडूंचा सहभाग आहे. ते सुद्धा सलग 19 तास दांडपट्टा चालवणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शौर्याचे प्रतीक म्हणून दांडपट्टा या शस्त्राला मोठी ओळख होती.

Shiv Jayanti 2025: मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त अनोखा विक्रम राज्यात करण्यात येणार आहे. सोलापुरात शिवजयंती निमित्त दांडपट्टा चालवण्याचा विश्वविक्रम करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 तारखेला झाला. त्यामुळे सलग 19 तास, 19 मिनिटे, 19 सेकंद दांडपट्टा चालवण्याचा विश्वविक्रम करण्याचा संकल्प सोलापुरात करण्यात आला. ट्रॅडिशनल दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशन, भारतीय लाठी महासंघाकडून हा विश्वविक्रम करुन छत्रपती शिवाजी महाराजांना अनोख्या पद्धतीने मानवंदना देण्यात येणार आहे.
कोण करणार विश्वविक्रम
सोलापुरात 19 तास, 19 मिनिटे, 19 सेकंद दांडपट्टा चालवून विश्वविक्रम करून शिवरायांना मानवंदना देण्यात येणार आहे. दांडपट्टा चालवणाऱ्या सात मावळ्यांकडून हा दांडपट्टा चालवण्याचा विश्वविक्रम करण्यात येणार आहे. सोलापुरातील चार पुतळा परिसरात पहाटे पाच वाजल्यापासून दांडपट्टा चालवण्यास सुरुवात होणार आहे. रात्री साडेबारा वाजेपर्यंत सात मावळ्यांकडून दांडपट्टा चालवत विश्वविक्रम पूर्ण करण्यात येणार आहे.
दांडपट्टा चालवणाऱ्या मावळ्यांमध्ये मुस्लीम खेळाडू
दांडपट्टा चालवणाऱ्या सात मावळ्यांमध्ये मुस्लीम खेळाडूंचा सहभाग आहे. ते सुद्धा सलग 19 तास दांडपट्टा चालवणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शौर्याचे प्रतीक म्हणून दांडपट्टा या शस्त्राला मोठी ओळख होती.




शिवाजी महाराज अफजल भेटीत छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानचा कोथळा बाहेर काढला. तेव्हा सैय्यद बंड शिवाजी महाराजांवर चालून आला. त्यावेळी महाराजांचे अंगरक्षक असलेले जिवाजी महाले यांनी महाराजांना वाचवले होते. सैय्यद बंड महाराजांवर चालून येताच दांडपट्टा काढून जिवाजी महाले यांनी त्याला पालथा पाडला. त्यामुळे “होता जिवा म्हणून वाचला शिवा”, ही म्हण प्रचलित झाली. या दांडपट्टा शस्त्राची सामान्य नागरिकांना ओळख व्हावी या उद्देशाने दांडपट्टा चालवण्याचा उपक्रम घेण्यात येत आहे, असे लाठी महासंघाचे अध्यक्ष शिवराम भोसले यांनी म्हटले आहे.
शिवजयंतीनिमित्त बुधवारी राज्यभरात विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहे. ठिकठिकाणी भगवे ध्वज आणि पताका लावून रस्ते सजवण्यात आले आहे. कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.