
हिरा ढाकणे, प्रतिनिधी: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीपूर्वी राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच पक्षांचे नेते अनेक ठिकाणचे दौरे करत आहेत. अशातच आता भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ कळवा रुग्णालयात गेल्या होत्या. यावेळी वाघ यांनी रुग्णालयातील आकडेवारीबद्दल माहिती घेतली आहे. मात्र चित्रा वाघ यांच्या या भेटीमुळे ठाण्यात अनेकांचे टेन्शन वाढले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
एकेकाळी जनतेच्या आरोग्यसेवेसाठी सुरू झालेला ‘आपला दवाखाना’ आता ठाण्यात साड्यांच्या विक्रीसाठी खुला झाला आहे. 2023 मध्ये मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी गाजावाजा करत हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही योजना सुरू केली होती. गरीब, गरजू आणि अति दुर्बल घटकांना मोफत प्राथमिक उपचार मिळावेत, हा उद्देश होता. 30 प्रकारच्या चाचण्या, 105 औषधे, 66 उपकरणे आणि तब्बल 210 कोटींचा निधी या योजनेला देण्यात आला होता. याअंतर्गत ठाण्यात सुमारे 50 ठिकाणी केंद्रं उभारली गेली. पण आता त्या दवाखान्यांपैकी अनेक ठिकाणी दरवाजे बंद आणि बॅनर धुळ खात पडलेले दिसत आहेत. एका केंद्रात तर साडीविक्री सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
आमदार चित्रा वाघ यांनी आज कळवा रूग्णालयाला भेट दिली. यावेळी ठाणे पालिका मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधीक्षक उपस्थित होते. यावेळी रुग्णालयातील आकडेवारीबद्दल चित्रा वाघ यांनी माहिती घेतली. चित्रा वाघ येताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची धावपळ झाली. प्रसूती कक्षासमोरील बेड उपलब्ध नसल्याच्या बोर्ड काढून टाकण्यात आला. बोर्डची साफ सफाई करून नवीन बोर्ड लावण्यात आला.
याबाबत बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, ‘कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय गरोदर महिलांना उपचारासाठी त्रास होत होता अशी बातमी सतत पेपरमध्ये होती. त्यामुळे मी आज या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि महिलांना होणारा त्रास साठी टीएमसी कमिशनर आणि हॉस्पिटलचे अधिकारी त्यांच्याशी विचारपूस केलेला आहे. तिथे 25 गरोदर महिलांसाठी सुविधा आहे आणि गरोदर महिलांची संख्या जास्त आहे. ठाणे-कल्याण-भिवंडी-भाईंदर येथून महिला येथे येतात. त्यामुळे हॉस्पिटलवर लोड आहे. बेडची संख्या वाढणार आहे.’
दरम्यान, चित्रा वाघ यांची ठाण्यातील एन्ट्री हे अनेकांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची यामुळे डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत शिवसेना आणि भाजपमध्ये युती झाली नाही तर दोन्ही पक्ष स्वतंत्र लढण्याची घोषणा करू शकतात. त्यामुळे चित्रा वाघ यांची आजची भेट ही शिवसेनेसाठीही डोकेदुखी ठरणार आहे.