Maharashtra Budget 2026 : मुख्यमंत्र्यांकडून 2026-27 सामाजिक समता व समरसता वर्ष साजरे करण्याची घोषणा, वाचा…

CM Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस यांनी 2026-27 हे सामाजिक समता व समरसता वर्ष साजरे करण्याची घोषणा केली. याअंतर्गत राज्यातील महापुरूषांचा सन्मान केला जाणार असून संपूर्ण राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.

Maharashtra Budget 2026 : मुख्यमंत्र्यांकडून 2026-27 सामाजिक समता व समरसता वर्ष साजरे करण्याची घोषणा, वाचा...
Social Equality and Harmony year
Image Credit source: X
| Updated on: Mar 06, 2026 | 3:21 PM

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. यावेळी राज्याच्या जनतेसाठी त्यांनी मोठ्या घोषणा केल्या. मुख्यमंत्री फडणवीस यांनी 2026-27 हे सामाजिक समता व समरसता वर्ष साजरे करण्याची घोषणा केली. याअंतर्गत राज्यातील महापुरूषांचा सन्मान केला जाणार असून संपूर्ण राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. यासाठी सरकारकडून निधीही दिला जाणार आहे. सामाजिक समता व समरसता वर्ष नेमकं काय आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

2026-27 – सामाजिक समता व समरसता वर्ष

राज्याच्या अर्थसंकल्पावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, हा अर्थसंकल्प 2047 च्या विकासाकडे जाणारा आहे. 2026-27 हे वर्ष सामाजिक समता व समरसता वर्ष साजरे केले जाणार आहे. महात्मा फुले यांच्या जन्माला 200 वर्ष पूर्ण होत आहे. यासाठी एक समिती स्थापन करुन विविध कार्यक्रम आयोजन करण्यासाठी निधी दिला जाणार आहे. संपूर्ण राज्यात या कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.

विविध विकासकामे केली जाणार

महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त चवदार तळे महाड येथील पायाभूत सोयीसुविधांसाठी विकास आराखडा तयार केला जाणार आहे. तसेच राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांची 150 व्या जयंतीनिमित्त संत गाडगेबाबा यांचे जन्मस्थळ, कर्मभूमी व समाधी यांना जोडणाऱ्या तीर्थश्रेत्र सर्किटचा विकास केला जाणार आहे. तसेच संत गाडगेबाबा ग्राम समृ्द्धी अभियान सुरु केली जाणार आहे. त्याचबरोबर एआयच्या मदतीने नागरिकांचे जीवनमान उंचवण्यासाठी संत गाडगेबाबा ग्राम उन्नत योजना सुरू केली जाणार आहे अशी घोषणाही करण्यात आली आहे. त्याचबरोबर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्तीनिमित्त दादर मुंबई येथील स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम जून 2026 पर्यंत पूर्ण करण्याचीही घोषणा यावेळी करण्यात आली आहे.

वर्षभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार

दरम्यान, महाराष्ट्र सरकारने 2026-27 हे वर्ष “सामाजिक समता व समरसता वर्ष” म्हणून घोषित केले आहे. याचा उद्देश समाजात समानता, प्रेम आणि सुसंवाद वाढवणे हो आहे. या संपूर्ण वर्षात वेळोवेळी विविध सामाजिक उपक्रम आणि कार्यक्रमांद्वारे जात, लिंग आणि धर्मावर आधारित भेदभाव नष्ट करण्याचे काम केले जाणार आहे.

Follow Us