… तर पुण्यात मला बहिष्कृत केलं असतं, CM फडणवीस असं का म्हणाले?

CM Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी भाषा गौरव दिनाबाबत भाषण केले. यावेळी त्यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यातील भाषा कशी वेगळी आहे याची माहिती दिली. ते नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

... तर पुण्यात मला बहिष्कृत केलं असतं, CM फडणवीस असं का म्हणाले?
Fadnavis on Marathi Bhasha
Image Credit source: X
| Updated on: Feb 27, 2026 | 7:40 PM

आज राज्यभरात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सध्या राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. आजच्या कामकाजात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त खास चर्चाही झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी भाषा गौरव दिनाबाबत भाषण केले. यावेळी त्यांनी विदर्भातील भाषा आणि मुंबईची आणि राज्यातील इतर भागाची भाषा कशी वेगळी आहे याची माहिती दिली. यावेळी त्यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वभाषेचा आनंद शिकवला – मुख्यमंत्री

आपल्या भाषणात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘मराठी संदर्भात छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वभाषेचा आनंद शिकवला. मराठी भाषा शुद्ध झाली पाहिजे म्हणून शब्दकोश तयार केला. फारशी व अरबी भाषेचा आक्रमण त्यावेळी कारभारात होते. ते शुद्ध करून कोष निर्माण करून प्रमाणभाषा छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवली. भाषेची यात्रा ज्ञानोबा तुकोबांच्या प्रवासात पाहायला मिळते. मराठीला आपण अभिजात मानत होतो. त्याला राजाश्रय मिळायला हवा होता. मोदीजींनी तो राजाश्रय दिला,’ असं मुख्यमंत्री म्हणाले.

पुण्यात मला बहिष्कृत केलं असतं…

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी, ‘दर 5-7 किलोमीटरला मराठी भाषा बदलते. विदर्भातून आलेला माझा सारखा माणूस सुरुवातीला का बे साल्या अशी भाषा वापरायचो. मुंबईत अशा भाषेची सवय नव्हती, पुण्यात तर मला बहिष्कृत केले असते. म्हणून मी भाषा आत्मसात केली. प्रत्येक भागाच्या मराठीत एक गोडवा आहे तो गोडवा आपल्याला कायम ठेवायचा आहे’ असं विधान केले.

लोककला पुढच्या पिढीपर्यंत नेणे काळाची गरज – फडणवीस

आपल्या भाषणात पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी, ‘लोककलेमुळे भाषा जिवंत असते. त्यामुळे लोकगीते कशी जिवंत ठेवता येतील, ती पुढच्या पिढीपर्यंत नेणे ही काळाची गरज आहे. या सगळ्या गोष्टी व भाषेने दिलेली देणगी पुढच्या पिढीपर्यंत नेली पाहिजे. ज्या ज्ञानभाषा व व्यवहार भाषा होतात त्याच चालतात. राज्यकर्त्यांची भाषा ही जगाची भाषा होते. मराठीमुळे प्रगती करता येते असा भाव आपण जागृत करू, तेव्हा मराठीला जगात मोकळी वाट करून देता येईल ‘असं विधान केले आहे.

Follow Us