Rahul Gandhi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातील मतदानावरुन राहुल गांधींचा मोठा आरोप

Rahul Gandhi : काही दिवसांपूर्वी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. आता राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा मतदारसंघावरुन गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघणार आहे.

Rahul Gandhi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातील मतदानावरुन राहुल गांधींचा मोठा आरोप
Devendra fadnavis Rahul Gandhi
| Updated on: Jun 24, 2025 | 12:48 PM

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. त्यांनी एका दैनिकात थेट लेख लिहून या निवडणुकीच्या प्रक्रियेवर बोट ठेवलं होतं. आता राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केला आहे. यावेळी त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक जिंकली.

“मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदार यादीत 5 महिन्यात 8% वाढ झाली. काही बुथवर 20 ते 50 टक्क्यांनी मतदार वाढले. काही अनोळखी माणसांनी मतदान केल्याची बीएलओ म्हणजे बूथ लेव्हल अधिकाऱ्यांनी तक्रार केली होती.
हजारो मतदारांचे पत्ते हे अयोग्य पद्धतीचे असल्याचे माध्यमांनी ही स्पष्ट केले आहे” न्यूज लाँड्रीच्या अहवालाचा दाखला देत राहुल गांधींनी हा आरोप केला. ‘निवडणूक आयोग गप्प का? ही मतदारांची एका अर्थी चोरीच’ असं राहुल गांधी यांनी म्हटलंय. म्हणून आम्ही सीसीटीव्ही फुटेजची मागणी करतोय असं राहुल गांधी म्हणाले.

देवेंद्र फडणवीस किती मताधिक्क्याने विजयी?

नागपूरचा दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. देवेंद्र फडणवीस यांनी या मतदासंघातून 2024 च्या विधानसभा निवडणुकीत 42 हजारपेक्षा जास्त मताधिक्क्याने विजय मिळवला. देवेंद्र फडणवीस यांनी 1,29,401 मतं मिळाली. प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवाराला 89,691 मतं मिळाली. 1978 पासून 8 वेळा भाजपने या मतदारसंघातून विजय मिळवला आहे.


निवडणूक आयोगाने काय म्हटलं?

राहुल गांधी यांनी लेख लिहून आरोप केले. त्यावर निवडणूक आयोगाने प्रतिक्रिया दिली. “महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पूर्ण पारदर्शक पद्धतीने घेण्यात आली. निवडणूक घेताना पूर्ण नियमांचे पालन करण्यात आले, असं निवडणूक आयोगाने म्हटलं. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील मतदारांची यादी, मतदानाची प्रक्रिया तसेच मतमोजणी ही लोकप्रतिनिधी कायदा 1950, निवडणूक नोंदणी नियम 1960 या कायद्यांच्या अधीन राहूनच करण्यात आली आहे. मतदानाच्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची अनियमितता झालेली नाही” असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.