मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपवर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया; म्हणाले, 500 कोटी नव्हे 2000 कोटी… नेमकं सत्य काय?
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपवर विजय वडेट्टीवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 500 कोटी नव्हे 2000 कोटी... नेमकं सत्य काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

सुनील ढगे, प्रतिनिधी : मनोज जरांगे पाटील यांनी शेअर केलेल्या ऑडिओ क्लिपने राजकारण तापलं आहे. या ऑडिओ बॉम्बने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. यावरुन सुरुवातीला महायुती आणि मनोज जरांगे यांच्यामध्येच आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. आता या वादात महाविकास आघाडीने उडी मारली आहे. या ऑडिओ क्लिपवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी 500 कोटी नव्हे तर 2000 कोटी असेल? नेमकं सत्य काय, याची चौकशी करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.
ऑडिओ क्लिपवर विजय वडेट्टीवार म्हणाले, जी ऑडिओ क्लिप महाराष्ट्रात गाजत आहे आणि प्रचंड व्हायरल होत आहे, ती पुढे आणल्याबद्दल जरांगे पाटलांचं मनापासून अभिनंदन करतो. यामुळे या सरकारचा खरा चेहरा जनतेच्या समोर आला आहे. भाजप आणि शिंदेसेना सत्तेसाठी एवढे भुकेले आहे, आम्ही पूर्वीपासून म्हणत होतो की, ओबीसी असो की मराठा असो या समाजाला कोणाचंही काढून न घेता न्याय द्यावा. कोणाचंही नुकसान होऊ देऊ नये ही आमची भूमिका होती. या दोन्ही सत्तेतील पक्षात मुख्यमंत्री होण्यासाठी लढाई सुरू आहे. मुख्यमंत्री होण्यासाठी काही करावे लागले, तरी स्पर्धा सुरू आहे. एकनाथ भाऊ आणि देवा भाऊ यांनी ओबीसी विरुद्ध मराठा वाद लावून महाराष्ट्राच्या जनतेचा वाटोळं केलं. सत्तेत येण्यासाठी यांनी दोन समाजात भांडण लावण्याचे काम केलं. त्यातून यांनी खुर्ची मिळवली आणि खुर्चीसाठी वाद सुरू आहे, ही क्लिप कोणी बाहेर आणली, याची चौकशी व्हायलाच पाहिजे’.
‘ऑडिओ क्लिपची चौकशी कुठल्या स्तरावर करावी हे दोन्ही सत्तेतील बसलेल्या लोकांनी करावे, परंतु एक गोष्ट स्पष्ट होते, की यांचं भांडण आता विकोपाला गेलं आहे. यामुळे महाराष्ट्रातील प्रश्न दुष्काळ एमपीएससीची वाट लागली आहे. हे सत्तेचे भुकेले असून जनतेचे नाही हे स्पष्ट झालं आहे किंवा सत्ता मिळविण्यासाठी कोणाचा जीव गेला काय किंवा भांडून मेले काय…यांना काही घेणं देणं नाही हे अधोरेखित झालं आहे. या क्लिपच्या माध्यमातून दोन पक्षातील दरी प्रचंड वाढली आहे, हे कुठे लपून राहिलं नाही. सत्य काय आहे 500 आहे 2000 आहे की आणखी काय हे क्लिप आली आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे. चौकशी कोणाची करायची, तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु चौकशी झाली पाहिजे हे आमचं स्पष्ट मत आहे. ईडीमार्फत करा की सीबीआय मार्फत करा सरकारला जे वाटते ते करा. परंतु वस्तुस्थिती लोकांच्या पुढे आणा. यात कोणी कोणाला बदनाम करत असेल, तर ती वस्तुस्थिती सुद्धा समोर आली पाहिजे आणि सत्य उघड झालं पाहिजे, असे ते पुढे म्हणाले.
