ठाकरेंच्या खासदारांनंतर आता काँग्रेसचेही नेते थेट दिल्लीत, त्या भेटीने चर्चेला उधाण, राजकारणात मोठी खळबळ!
ज्यांना जायचं आहे त्यांना जाऊ द्या. ते आज जातील पण उद्या पश्चात्ताप करतील, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तसेच आज माझ्याकडे काहीच नाही. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी धीर धरावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Congres Leaders : राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार लवकरच ठाकरे यांच्या पक्षाचे काही खासदार बंडखोरी करणार आहेत. हे खासदार लवकरच आपला वेगळा गट तयार करण्याची शक्यता आहे. त्यासाटी दिल्लीत मोठ्या हालचाली सुरू आहेत. ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार संजय देशमुख यांनी शिंदे गटाचे नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेतली आहे. बंडखोर खासदार लवकरच लोकसभा अध्यक्षांना वेगळ्या गटाबाबत पत्र देणार असल्याचेही बोलले जात आहे. दरम्यान आता एकीकडे ठाकरे यांच्या खासदारांचे कथित बंड चर्चेत असताना आता काँग्रेसचे काही बेडे नेतेदेखील थेट दिल्लीत पोहोचले आहेत. त्यामुळे आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
ठाकरे यांच्या पक्षाची नेमकी भूमिका काय?
दुसरीकडे आमच्या पक्षातील सर्व खासदार आमच्यासोबत आहेत. कोणीही बंडखोरी करणार नाही, असा दावा ठाकरे यांच्या पक्षाकडून केला जात आहे. दुसरीकडे खुद्द उद्धव ठाकरे यांनीदेखील या कथित बंडखोरीवर प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांना जायचं आहे त्यांना जाऊ द्या. ते आज जातील पण उद्या पश्चात्ताप करतील, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तसेच आज माझ्याकडे काहीच नाही. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी धीर धरावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. येत्या 22 जून रोजी ठाकरे यांनी आपल्या आमदारांची बैठक बोलावली आहे.
नेमकी काय माहिती समोर आली आहे?
मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस पक्षातील मराठवाड्यातील काही माजी खासदार, माजी आमदार तसेच काही बडे नेते हे थेट दिल्लीला पोहोचले आहेत. हे सर्व नेते काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार मराठवाड्यातील हे नेते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची तक्रार खरगे यांच्याकडे करणार आहेत. दिल्लीत जाणाऱ्या नेत्यांमध्ये माजी मंत्री अनिल पटेल, माजी आमदार नामदेव पवार, नेते संजय राठोड, नेते तुकाराम रेंगे यांच्यासह अनेक नेते हे थेट दिल्लीमध्ये पोहोचले आहे. त्यामुळे आता नेमकं काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.