
राज्यात सध्या महानगर पालिकेच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे. राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. अनेक पक्षांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे. निवडणूकीची तयारी सुरू असताना आता अनेक नेते पक्षांतर करताना दिसत आहेत. सोलापूर महानगर पालिकेच्या निवडणुकीचीही घोषणा झाली आहे. आता या ऐन निवडणुकीच्या काळात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. एका माजी आमदाराने असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीपूर्वी भाजपची ताकद आणखी वाढणार आहे. हा नेता नेंमका कोण आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
सोलापूर हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. आता याच बालेकिल्ल्यात काँग्रेसला खिंडार पडले आहे. काँग्रेसचे दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. त्यामुळे आगामी निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे. याचा परिणाम थेट आगामी महानगर पालिकेवर होण्याची शक्यता आहे.
माजी आमदार दिलीप माने यांच्यासह सोलापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक जयकुमार माने, माजी नगरसेवक नागेश ताकमोगे, माजी नगरसेवक दादाराव ताकमोगे, सोलापूर बाजार समितीचे प्रथमेश पाटील, माने सहकारी बँकेचे संचालक आनंद देटे, काँग्रेसचे युवा अध्यक्ष पृथ्वीराज माने, साखर कारखान्याचे चेअरमन धनंजय भोसले, नागनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा.सतीश दरेकर, सोलापुरचे उद्योजक श्रीकांत मेलगे-पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांच्यासह भाजपाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
🪷 तुमची आमची भाजपा सर्वांची 🪷
दक्षिण सोलापुरचे माजी आमदार दिलीप माने यांचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह भाजपा परिवारात प्रवेश!
📍पक्ष प्रवेश करणारे मान्यवर-
सोलापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक जयकुमार माने, माजी नगरसेवक नागेश ताकमोगे, माजी नगरसेवक दादाराव ताकमोगे, सोलापूर… pic.twitter.com/4NvbT7Ajs1— Ravindra Chavan (@RaviDadaChavan) December 18, 2025
काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा गेल्या काही काळापासून रंगली होती. माने यांनी याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. मात्र स्थानिक भाजप नेत्यांनी त्यांच्या प्रवेशाला विरोध केला होता. त्यामुळे माने यांचा पक्षप्रवेश काही काळ लांबला होता. मात्र आता त्यांनी अनेक माजी नगरसेवक आणि इतर पदाधिकाऱ्यांसह भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.