#Fake News Alert : संचारबंदीत दूध-किराणा खरेदीबाबत 'तो' व्हायरल मेसेज खोटा

दूध-किराणा किंवा औषध खरेदीसाठी ठराविक वेळेची मर्यादा असल्याबाबत मुंबई पोलीस आयुक्तांच्या नावे व्हायरल मेसेजमध्ये कोणतेही तथ्य नाही (Corona Curfew Fake Message Alert)

#Fake News Alert : संचारबंदीत दूध-किराणा खरेदीबाबत 'तो' व्हायरल मेसेज खोटा

मुंबई : ‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात संचारबंदी लागू केली आहे. या काळात दूध-किराणा किंवा औषध खरेदीसाठी ठराविक वेळेची मर्यादा असल्याचा पोलिसांच्या नावे व्हायरल झालेला मेसेज खोटा आहे. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाकडून हा मेसेज ‘फेक’ असल्याची पुष्टी देण्यात आली आहे. (Corona Curfew Fake Message Alert)

मुंबई पोलीस आयुक्तांच्या नावे विविध समाजमाध्यमांवर खोटा संदेश व्हायरल झाला आहे. ‘वृत्तपत्र विकत घेण्यासाठी केवळ सातपर्यंत, तर दूध घेण्यासाठी सकाळी सहा ते आठ इतकीच वेळ’ असल्याचं खोटं वृत्त या मेसेजमधून प्रसारित करण्यात आलं आहे.

विशेष म्हणजे ‘भाज्या, किराणा आणि औषध घेण्यासाठी केवळ 24, 26, 28 आणि 30 या चार दिवशीच सकाळी 8 ते 11 या वेळेत मुभा आहे’ अशी खोटी माहिती मुंबई पोलीस आयुक्तांच्या नावे व्हायरल केली जात आहे. परंतु या मेसेजमध्ये कोणतेही तथ्य नाही. नागरिकांना काही अडचण किंवा शंका असल्यास 100 नंबर डायल करण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.

अत्यावश्यक वस्तू व सेवा पुरविणाऱ्या खालील दुकाने आणि आस्थापने यांना वरील निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. 

1. बॅंका/ एटीएम, विमा, फिन्टेकसेवा आणि अन्य संबंधित सेवा
2. मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे
3. टेलिकॉम, टपाल, इंटरनेट, डेटासेवा यांसह माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सेवा.
4. अत्यावश्यक वस्तूंची पुरवठा साखळी आणि वाहतूक
5. शेतमाल आणि अन्य वस्तूंची निर्यात आणि आयात
6. खाद्य पदार्थ, औषधे आणि वैद्यकीय उपकरणे यांसह आत्यावश्यक वस्तूंचे ई-कॉमर्सद्वारे वितरण
7. खाद्य पदार्थ, किराणा, दूध, ब्रेड, फळे, भाजीपाला, अंडी, मांस, मासे यांची विक्री, वाहतूक आणि साठवण (Corona Curfew Fake Message Alert)
8. बेकरी आणि पाळीव प्राण्यांसाठीचे खाद्यपदार्थ आणि पशुवैद्यकीय सेवा
9. उपाहारगृहांमधून घरपोच सेवा
10. रूग्णालये, औषधालये आणि चष्म्याची दुकाने, औषधांचे कारखाने, विक्रेते आणि वाहतूक
11. पेट्रोल पंप, एलपीजी गॅस, ऑईल एजन्सीज त्यांची साठवण आणि त्यांच्याशी संबंधित वाहतूक व्यवस्था
12. अत्यावश्यक सेवांकरिता खासगी संस्थांमार्फत पुरविल्या जाणाऱ्या सुरक्षासेवेसह अन्य सेवा देणाऱ्या संस्था
13. अत्यावश्यक सेवांना किंवा कोविड १९ प्रतिबंधासाठी होणाऱ्या प्रयत्नांना मदत करणारी खासगी आस्थापने.
14. वरील बाबींशी संबंधित पुरवठा साखळी
15. तत्वतः वरील सर्व निर्बंध, लोकांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यासाठी आहेत. वस्तूंच्या दळण-वळणावर निर्बंध घालण्यासाठी नाहीत, हे सर्व अंमलबजावणी कार्यालयांनी लक्षात घ्यावे, असेही अधिसूचनेत म्हटले आहे.

राज्य शासनाचे विभाग आणि कार्यालये आणि सार्वजनिक उपक्रम हे फक्त अत्यावश्यक सेवा देण्यासाठीच कार्यरत राहतील.

कोणत्याही संप्रदायांची सर्व धार्मिक स्थळे सुयोग्य अशा प्रतिबंधात्मक आदेशान्वये बंद करण्यात येतील.

बंदीच्या काळात अत्यावश्यक गरजेच्या वस्तूंच्या पुरवठ्याबाबत कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जातील.

Corona Curfew Fake Message Alert

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *