‘समीप आलेली लग्नघटिका’ पुढे ढकलली, 5 हजार वऱ्हाडी थोपवले, ‘कोरोना’मुळे विवाह सोहळे रद्द

विवाह सोहळ्यात गर्दी जमून 'कोरोना'चा फैलाव होऊ नये, यासाठी शासनाने केलेलं आवाहन पाळत अनेक वधू वर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सोहळे पुढे ढकलले आहेत Corona Effect Weddings Postponed

'समीप आलेली लग्नघटिका' पुढे ढकलली, 5 हजार वऱ्हाडी थोपवले, 'कोरोना'मुळे विवाह सोहळे रद्द

मुंबई : ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विवाह सोहळे पुढे ढकलण्याचं आवाहन सरकारकडून केलं जात आहे. गुढीपाडवा अवघ्या काही दिवसांवर आलेला असताना राज्यात अनेक विवाह सोहळे आयोजित करण्यात आले आहेत. मात्र गर्दीत कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेत अनेक कुटुंबांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. कोणी विवाह पुढे ढकलला, तर कोणी मोठ्या सोहळ्यांना काट लावत छोटेखानी समारंभ करण्याचा निर्णय घेतला आहे. (Corona Effect Weddings Postponed)

अडकीने-देशमुख कुटुंबाने 5 हजार वऱ्हाडी थोपवले

हिंगोली जिल्ह्यातील एका कुटुंबाने अवघ्या एका दिवसावर आलेला विवाह पुढे ढकलला. आपल्या आनंदाच्या सोहळ्यामुळे कोरोनाच्या साथीचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून अडकीने आणि देशमुख कुटुंबाने एकमताने हा विवाह पुढे ढकलला. 5 हजार वऱ्हाडी आमंत्रित असताना हा विवाह अचानक पुढे ढकलण्यात आला.

हिंगोली जिल्ह्यात राहणारे अडकीने कुटुंब चार महिन्यापासून विवाहाची जय्यत तयारी करत होते. 19 मार्चला अर्धापुर तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथील अनुसया मंगल कार्यालयात विवाह करण्याचे योजिले होते. लग्नाची सर्व तयारीही झाली होती. नातेवाईक मंडळी जमली होती, घरात आनंदाचं वातावरण होतं, मात्र शासनाच्या आवाहनानंतर अडकीने आणि देशमुख या दोन्ही सुशिक्षित कुटुंबांनी एका दिवसावर आलेला विवाह पुढे ढकलला. (Corona Effect Weddings Postponed)

आकुर्डीतही लग्न सोहळा पुढे ढकलला

पिंपरी चिंचवडच्या आकुर्डीतील महाजन आणि नडगिरे कुटुंबीयांनीही समाजापुढे असाच आदर्श ठेवला आहे. सर्व खरेदी झाली, तयारी झाली, निमंत्रण पत्रिका वाटून झाल्या होत्या. परंतु सामाजिक बांधिलकी म्हणून हा लग्न सोहळा रद्द केला आहे.

नागपुरात घरच्या घरी लग्न

नागपुरातील बतकी आणि डाहुले कुटुंबाने शेकडो वऱ्हाड्यांच्या सुरक्षेसाठी लग्न सोहळ्याला काट मारण्याचा निर्णय घेतला. ठरलेल्या मुहूर्तावर उद्या घरच्या घरी दोघांचा विवाह लावला जाणार आहे. मात्र मोठा सोहळा करण्याचं या कुटुंबांनी टाळलं.

नांदेडमधील कुटुंबाची सामाजिक जाण

माधवराव शंकपाळे यांची कन्या मधुलिकाचा 19 मार्च रोजी विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. शंकपाळे आणि आशिष मुदिराज यांच्या कुटुंबाने लग्न सोहळ्याची जय्यत तयारी केली होती. लग्नासाठी उस्माननगर रोडवरचे मंगल कार्यालय देखील बुक करण्यात आले होते. मात्र कोरोनाचा फैलाव वाढू नये, म्हणून या दोन्ही कुटुंबांनी सामाजिक जाणिव ठेवत लग्नसोहळा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. कोरोनाचा धोका कमी झाल्यावर हा लग्न सोहळा पार पडणार आहे. (Corona Effect Weddings Postponed)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI