हैदराबाद गॅझेट विरोधातील याचिका न्यायालयानं फेटाळली, जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, भुजबळांना काय म्हणाले?

हैदराबाद गॅझेटच्या जीआर विरोधात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका हाय कोर्टानं फेटाळून लावली आहे, यावर आता मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

हैदराबाद गॅझेट विरोधातील याचिका न्यायालयानं फेटाळली, जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, भुजबळांना काय म्हणाले?
Image Credit source: tv9 marathi
Updated on: Sep 18, 2025 | 6:35 PM

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात हैदराबाद गॅझेट लागू करण्यात आलं आहे, मात्र त्यावरून आता ओबीसी समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. ओबीसी समाजाकडून हैदराबाद गॅझेटच्या जीआरला विरोध होत आहे. हैदराबाद गॅझेटच्या जीआरविरोधात मुंबई हाय कोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती, मात्र ही जनहित याचिका हाय कोर्टानं आज फेटाळून लावली आहे. हा मराठा समाजासाठी मोठा दिलासा मानला जात आहे, दरम्यान यावर आता मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील? 

हैदराबाद गॅझेटच्या जीआरविरोधातील याचिका फेटाळल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. आमचा न्याय देवतेवर विश्वास आहे, गोरगरिबांच्या बाजूने न्यायदेवता उभी राहाते, सरकारनंतर न्यायदेवता हीच गोरगरिबांचा आधार आहे.  सरकारला त्यांची बाजू भक्कमपणे मांडावीच लागणार आहे, असं यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर देखील पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी भुजबळांचा उल्लेख अलिबाबा असा केला आहे. येवल्याचा अलिबाबा दोन आरक्षण खात आहे, त्यांना लवकरच बेसन -भाकरी खावी लागेल असा खोचक टोला यावेळी जरांगे पाटील यांनी भुजबळ यांना लगावला आहे. मी गोरगरिबांसाठी सर्व काही करत आहे. समाजाला माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. काही अभ्यासकांनी समाजाला अजून काहीच दिलं नाही, मी माझं काम करत आहे, त्यामुळे समाजाने जे गैरसमज पसरवतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नये, असं देखील यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

भुजबळांची प्रतिक्रिया  

दरम्यान हैदराबाद गॅझेटची याचिका फेटाळून लावल्यानंतर भुजबळ यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे.  आम्ही सांगितलं होतं जनहित याचिका नको, रिट याचिका करा,  आतापर्यंत आम्ही 4-5 रीट याचिका केल्या आहेत. असं यावेळी भुजबळ यांनी म्हटलं आहे. तसेच लेकरंबाळ आमची देखील आहेत, असं म्हणत त्यांनी यावेळी मनोज जरांगे पाटील यांना टोला लगावला आहे.