पीक वाहून गेलं, डोंगराएवढं दु:ख, अमरावतीच्या शेतकऱ्यानं थेट निमंत्रण पत्रिकाच छापली, वाचून बघा डोळ्यात पाणी येणार
महाराष्ट्राला यंदा पावसाचा चांगलाच तडाखा बसला आहे, पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. मात्र अजूनही पिकांचे पंचनामे होत नसल्यानं आता शेतकऱ्यानं थेट निमंत्रण पत्रिकाच छापून प्रशासनाचा निषेध केला आहे.

महाराष्ट्रात यंदा आतापर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे, राज्यातील जवळपास सर्वच विभागांना पावसाचा मोठा तडाखा बसला. अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसाने नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे, पिकं पाण्याखाली गेली आहेत. ऐन हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतल्यामुळे शेतकरी हातबल झाले आहे. शेतीचं प्रचंड नुकसान झालं असून, आता शेतकऱ्यांची नजर सरकारच्या मदतीकडे लागली आहे.
मात्र सध्या अनेक भागांमध्ये शेतीचं मोठं नुकसान होऊन देखील वेळेत नुकसानीचे पंचनामे होत नसल्याचं चित्र आहे, त्यामुळे शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे. पावसाचा सर्वाधिक फटका हा विदर्भ आणि मराठवाड्याला बसला आहे. दरम्यान याचा आता अमरावतीमधील एका शेतकऱ्यानं आगळ्या -वेगळ्या पद्धतीनं निषेध केला आहे. त्यानं थेट निमंत्रण पत्रिकाच छापली आहे.
काय म्हटलंय निमंत्रण पत्रिकेत?
‘ शेतमाऊलीच्या कृपेने, आपणांस कळविण्यात आनंद होत आहे की, यावर्षी आम्ही शेतकरी बांधवांनी दरवर्षी प्रमाणे आमच्या शेतात सोयाबीन पिकाची लागवड केली आहे. परंतु अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे संपूर्ण पिकांचे नुकसान झाले आहे. तरी आपल्या विभागाला वारंवार सांगून सुद्धा शेताची पाहणी करण्याकरिता कोणीही येऊ शकले नाही. आपणांस आमंत्रित करण्यास अत्यंत आनंद होत आहे की, सोमवार दि. 22/09/ 2025 रोजी घटस्थापनेच्या मुहूर्तावर संपूर्ण पत्रकार बांधवांच्या उपस्थितीमध्ये सोयाबीन पिकावर ट्रॅक्टर व रोटाव्हेटर फिरवण्याचा कार्यक्रम ठरविला आहे. तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे, ही विनंती, आल्पोपहाराची व्यवस्था केलेली आहे, स्थळ आमचे शेत, शेंदोळा बु. मैजे सुजातपूर ता. तिवसा जि. अमरावती.’ अशी ही निमंत्रण पत्रिका द्यायाराम राठोड या शेतकऱ्याने छापली आहे. ही निमंत्रण पत्रिका राज्यभरात चर्चेला विषय ठरली आहे.

मराठवाडा, विदर्भाला सर्वाधिक तडाखा
दरम्यान यंदा मराठवाडा आणि विदर्भात अतिवृष्टीची नोंद झाली, प्रचंड पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. पावसाचा खरीप हंगामातील पिकांना मोठा तडाखा बसला असून, शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे.
