मेट्रो लाईन 8 ते समृद्धी महामार्ग विस्तार, सरकारचे 3 सर्वात मोठे निर्णय; आता कायापालट होणार!

राज्य सरकारने आज काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. सरकारने मेट्रो लाईन 8 ला मंजुरी दिली आहे. तसेच या प्रकल्पासाठी भूसंपादनाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, असे निर्देशही फडणवीस यांनी दिले आहेत.

मेट्रो लाईन 8 ते समृद्धी महामार्ग विस्तार, सरकारचे 3 सर्वात मोठे निर्णय; आता कायापालट होणार!
METRO LINE 8 SAMRUDDHI MAHAMARG
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 27, 2026 | 3:34 PM

Mumbai Metro Line 8 :  आज (27 जानेवारी) राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या पायभूत सुविधा समितीची बैठक झाली. याच बैठकीत फडणवीस यांनी वरील निर्देश दिले. समृद्धी महामार्गाचा विस्तार हा गोंदिया- भंडारा- गडचिरोली या जिल्ह्यांपर्यंत होणार आहे. प्रकल्पांची कामे विहित कालावधीत पूर्ण करा, प्रकल्प रेंगाळू देऊ नका असे फडणवीस यांनी सांगितले आहे. सोबत या बैठकीत मुंबईतील मेट्रो लाईन 8 प्रकल्प सीएसएमटी ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडण्यास मंजुरी देण्यात आली आहे. पुढील तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा आदेशही फडणवीस यांनी दिला आहे. हा प्रकलण एकूण 35 किलोमीटरचा असणार आहे.

मेट्रो लाईन 8 चे काम तीन वर्षांत पूर्ण करा

सोबतच छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या मेट्रो लाईन 8 चे भूसंपादनासह विविध मंजुरीची कामे पुढील सहा महिन्यात पूर्ण करा असाही आदेश फडणवीस यांनी दिला आहे. हा प्रकल्प आगामी तीन वर्षांत पूर्ण झाला पाहिजे, असेही फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना सांगितले आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा यासाठी तो सुरु होण्याआधीच सर्व परवानग्या घ्या असेही फडणवीस यांनी सांगिते आहे.

मेट्रो मार्गाची एकूण लांबी 35 किलोमीटर

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मेट्रो लाईन 8 जोडणीस मान्यता देण्यात आली आहे. या मेट्रो मार्गाची एकूण लांबी 35 किलोमीटर असणार आहे. यापैकी भूमिगत मार्ग 9.25 किलोमीटर, उन्नत मार्ग 24.636 किमीचा असेल. या मेट्रोमार्गावर एकूण 20 स्थानके असतील. यातील 6 स्थानके भूमिगत तर 14 स्थानके उन्नत असतील.

भूसंपादनासाठी 388 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2 स्थानक ते घाटकोपर पूर्वपर्यंत भूमिगत स्थानके असतील. घाटकोपर पश्चिम स्थानक ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2 स्थानकापर्यंत उन्नत स्थानके असतील. दोन स्थानकांतील सरासरी अंतर 1.9 किलोमीटर असे असेल. या प्रकल्पासाठी 30.7 हेक्टर भूसंपादनाची आवश्यकता आहे. या भूसंपादनासाठी 388 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी एकूण 22 हजार 862 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

समृद्धी महामार्गाच्या विस्ताराच्या कामाला गती द्या

राज्यात दिवसेंदिवस रस्त्यांचं जाळं वाढवलं जात आहे. वाहतूक सोपी आणि किफायतशीर व्हावी यासाठी सरकारकडून नवनवे मार्ग तयार केले जात आहेत. असे असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाच्या विस्ताराच्या कामाला गती द्या, असा थेट आदेश फडणवीस यांनी दिला आहे.

नाशिक शहर परिक्रमा मार्ग

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर परिक्रमा मार्गाला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मार्गाची एकूण लांबी 66.15 किलोमीटर आहे. या प्रकल्पासाठी एकूण 3 हजार 954 कोटीच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील खनिज वाहतुकीसाठी नवेगाव मोरे – कोनसरी – मूळचेरा – हेदरी – सुरजागड महामार्गाच्या सुधारित 85.76 किलोमीटर लांबीस मान्यता देण्यात आली आहे. हा मार्ग चार पदरी सिमेंट आणि काँक्रिटचा असेल.