
श्रीलंकेनंतर आता चक्रीवादळ डिटवाहने भारतात धुमाकूळ घातला आहे. या चक्रीवादळामुळे उत्तर तामिळनाडूच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस सुरू असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे. आतापर्यंत तामिळनाडूमध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाकडून तामिळनाडू,पाँडेचेरी, आणि आंध्र प्रदेशमधील अनेक भागांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार हे चक्रीवादळ आता तामिळनाडूच्या किनारी भागांकडे सरकत आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार हे चक्रीवादळ सध्या बंगालच्या उपसागरात उत्तर तामिळनाडू आणि पाँडेचेरीच्या किनारी भागाच्या जवळपास पोहोचलं आहे.गेल्या सहा तासांपासून हे चक्रीवादळ प्रति तास सात किमी वेगानं मार्गक्रमण करत आहे. पुढील 24 तासांमध्ये हे चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याचा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार हे चक्रीवादळ पुढील 24 तासांमध्ये अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांमध्ये हे चक्रीवादळ तामिळनाडू आणि पाँडेचेरीच्या किनार पट्टीला समांतर उत्तर दिशेनं पुढे सरकरण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे किनारी भागात मोठं नुकसान होणार असल्याचा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला असून चक्रीवादळ प्रभावित भागांमध्ये योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे.
मुसळधार पावसाचा इशारा
या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा तामिळनाडूला बसणार आहे, तामिळनाडूच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार आहे, हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तामिळनाडू सोबतच आंध्र प्रदेश आणि पाँडेचेरीमध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. कर्नाटक राज्यात देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तामिळनाडूमध्ये चक्रीवादळ डिटवाहाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफची पथकं तैनात करण्यात आली आहेत.
महाराष्ट्रात काय स्थिती?
महाराष्ट्रात या चक्रीवादळामुळे पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी तापमानात घसरण होऊन थंडीचा कडाका देखील वाढू शकतो. तर विदर्भातील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.