
सध्या शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर आहे. काल ते इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी सहभागी झाले होते. उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे, संजय राऊतही नवी दिल्लीत गेले होते. या इंडिया आघाडीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी निवडणुकीत खोट्या मतदारांद्वारे कसे मतदान होत आहे त्याला भाजप आणि निवडणूक आयोगाची कशी साथ आहे, याचे प्रेझेंटेशन केले. या बैठकीत एक फोटो व्हायरल झाला होता. त्यामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे खूप मागे, शेवटच्या रांगेत बसल्याचे दिसत होते. आता यावरुन सध्या राजकारण रंगताना दिसत आहे.
नुकतंच या संपूर्ण प्रकरणावरुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांना उद्धव ठाकरेंच्या रांगेत बसण्याच्या वादाबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी भाष्य केले. “जे स्वाभिमान गहाण टाकतात, बाळासाहेबांचे विचार विकतात, सोडतात. त्यांना त्याचं काहीही वाटणार नाही. त्यामुळे काँग्रेसने त्यांना त्यांची जागा दाखवली असेल”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
“त्यांना या गोष्टीचं काही वाटत नसेल तर मी यावर काय प्रतिक्रिया देणार. खरं म्हणजे ज्यांचा अपमान झालाय, अवमान झालाय, त्यांना त्याचं काही वाटत नसेल तर मला त्यावर कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही. जे स्वाभिमान गहाण टाकतात, बाळासाहेबांचे विचार विकतात, सोडतात. त्यांना त्याचं काहीही वाटणार नाही. त्यामुळे काँग्रेसने त्यांना त्यांची जागा दाखवली असेल. यामुळे मी त्यावर काही प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही. हे उलट तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे की तुम्हाला इतक्या मागे का बसवलं होतं”, असा खोचक टोला एकनाथ शिंदेंनी लगावला.
“आम्ही बाळासाहेब आणि हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे चाललो आहे. विकासाचा विचार पुढे घेऊन चाललो आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदेंना काही देशांचा दौरा करणाऱ्या डिलीगेशनचा हेड बनवला आहे. त्यामुळे मोदींना कोणाचा सन्मान करायचा, कोणाला मान द्यायचा हे त्यांना माहिती आहे. यात बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन चाललोय हा त्या विचाराचा सन्मान आहे. ज्यांचा अवमान झाला, त्यांना त्याचं काही वाटत नसेल तर मी काय प्रतिक्रिया देणार तुम्ही त्यांना विचारायला हवं. ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, ज्यांनी विचार सोडले, त्यांचं हे असंच होणार आहे. त्यांची जागा त्यांना काँग्रेसने दाखवली. त्यामुळे अनेक लोक म्हणतात की विचार पुढे असतात आणि लाचार मागे असतात”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.