च्या आयला गद्दार कुणाला म्हणतो रे… देसाई-परब यांच्यात खडाजंगी, अखेर ते शब्दही रेकॉर्डवरून काढले

विधानपरिषदेत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते शंभुराज देसाई यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली. मुंबईत मराठी माणसांना घर मिळाली पाहिजेत, या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना जोरदार वाद झाला.

च्या आयला गद्दार कुणाला म्हणतो रे... देसाई-परब यांच्यात खडाजंगी, अखेर ते शब्दही रेकॉर्डवरून काढले
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 10, 2025 | 2:54 PM

राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. याचदरम्यान आज विधानपरिषदेत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते शंभुराज देसाई यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली. मुंबईत मराठी माणसांना घर मिळाली पाहिजेत, या मुद्द्यावर चर्चा सुरू होती. त्याचवेळी मराठी माणसांच्या घरांसाठी कायदा करणार का? असा सवाल अनील परब यांनी विचारला. त्यावेळी 2019 ते 2022 या काळात तुम्ही कायदा केला नाही, असं उत्तर शंभुराज देसाई यांनी अनिल परब यांना दिलं.

नेमकं काय घडलं? 

मराठी मणासांना प्राधान्यानं घर मिळालं पाहिजे, हा कायदा आहे का? तर नाही. सरकारची इच्छा आहे, मराठी मणसांची इच्छा आहे, आमचं पण तेच म्हणणं आहे, कायदा झाला पाहिजे, असं अनिल परब यांनी म्हटलं. त्यावर उत्तर देताना शंभुराज देसाई यांनी म्हटलं की,  2019 ते 2022 या काळात सरकारने असा काही निर्णय घेतला होता का? अशा पद्धतीचा नियम तुम्ही केला होता का? अशा पद्धतीचा कायदा तुम्ही केला होता का? त्यावेळी तो झाला नाही.  दरम्यान त्याचवेळी अनिल परब यांनी गद्दार हा शब्द वापरला, आणि हा वाद सुरू झाला. त्यानंतर शंभुराज देसाई चांगलेच संतापले, तुम्ही गद्दार कोणाला म्हणता? असा सवाल त्यांनी यावेळी परब यांना केला. तसेच तेव्हा तुम्ही बूट चाटत होता, असंही ते यावेळी म्हणाले.

ते शब्द रेकॉर्डवरून हटवले 

दरम्यान वाद वाढल्यामुळे सभागृहाचं कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं. त्यानंतर हे शब्द रेकॉर्डवरून हटवण्याच्या सूचना विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी दिल्या, त्यानंतर ते शब्द रेकॉर्डवरून काढून टाकण्यात आले.

शंभुराज देसाई यांचा इशारा   

घडलेल्या प्रकाराबाबत माहिती देताना शंभुराज देसाई यांनी म्हटलं की, मिलींद नार्वेकरांच्या प्रश्नाला मी उत्तर देत होतो,  मुंबईतील मराठी भाषीकांना घरे देण्यात प्राधान्य देण्याचे 2021 ते  2022 मध्ये आसे कोणतेही धोरण नव्हते, हे सांगितल्यावर अनिल पराब यांना राग आला. त्यांनी माझा उल्लेख गद्दार केला, मी पण त्यांना प्रत्युत्तर दिलं, आमच्यात बाचाबाची झाली. त्यांनी आता जर प्रकरण वाढवायचं ठरवलं तर आम्ही सुद्धा डबल करू, आम्ही सुद्धा बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत, असा इशारा यावेळी देसाई यांनी दिला आहे.