Omicronचे भयः नाशिकमध्ये पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय 10 डिसेंबरपर्यंत पुढे

| Updated on: Nov 29, 2021 | 3:51 PM

नाशिक महापालिका हद्दीतील पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय आता 10 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे आणि त्याच्या भीतीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

Omicronचे भयः नाशिकमध्ये पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय 10 डिसेंबरपर्यंत पुढे
सांकेतिक फोटो
Follow us on

नाशिकः नाशिक महापालिका हद्दीतील पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय आता 10 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे आणि त्याच्या भीतीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. सध्या नाशिकमध्ये माध्यमिकचे वर्ग सुरू आहेत.

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील शाळा 4 ऑक्टोबर 2021 पासून ऑफलाईन स्वरुपात सुरू होत्या. त्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक अशा सर्व शाळांना 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत म्हणजे एकूण 14 दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली होती. या काळात शाळांकडून सुरू असलेले ऑनलाईन अध्यापनही बंद ठेवण्यात आले होते. मात्र, नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी व्ही. एम. कदम यांनी स्वतंत्र परिपत्रक काढून शाळांची सुट्टी वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता या शाळांची दिवाळी सुट्टी 20 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली. सोबतच 21 नोव्हेंबरला रविवार आहे. त्यामुळे 22 नोव्हेंबरपासून हे वर्ग सुरू झाले. मात्र, आता पुन्हा एकदा ओमिक्रॉनमुळे त्यांच्यावरही भीतीचे सावट कायम आहे.

प्राथमिकचा निर्णय लांबणीवर

राज्यात येत्या 1 डिसेंबरपासून प्राथमिकच्या शाळा सुरू होणार आहेत. तशी तयारीही ठिकठिकाणी करण्यात आली होती. मात्र, या शाळा सुरू होणार आहेत की नाहीत, यावर साशंकता आहे. आज मंत्रिमंडळ बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय होण्याची शक्यता होती. याबाबत माहिती देताना आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, या बैठकीत शाळा सुरू करण्याबाबत चर्चा झाली नाही. या बाबतचा निर्णय आरोग्य विभाग घेणार आहे. त्यामुळे आरोग्य विभाग काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

परिस्थिती पाहून निर्णय

नाशिकमध्ये मात्र तूर्तास तरी महापालिका हद्दीतील पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय 10 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. महापालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत. आता पुन्हा शाळा सुरू करायच्या की नाही, याचा निर्णय कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची परिस्थिती पाहून घेण्यात येणार आहे. म्हणजे कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने आपले प्रताप दाखवले, तर यंदाही प्राथमिकच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय बासनात गुंडाळला जाऊ शकतो.

इतर बातम्याः

ओमिक्रॉनमुळे साहित्य संमेलनाचे होणार काय, मुख्य मंडपाची आसनक्षमता 14 हजार, बाका प्रसंग उद्भवला…!

संदीप-सलीलची मैफल कंपूगिरी म्हणत ट्रोल; एकाच गल्लीतील कार्यक्रम म्हणून हिणवणे सुरू, नेमकं कारण काय…?