आता थेट कारवाई, संजय दिना पाटील प्रकरणानंतर फडणवीसांची तीव्र नाराजी, दिला थेट इशारा!
संजय दिना पाटील हे सध्या महायुतीत आहेत. त्यांनी केलेल्या विधानात एका प्रकार राज्याच्या गृहखात्यालाही आव्हान देण्यात आलेले होते. कमिशनरकडे जा आणि तक्रार करा. व्हिडीओ रेकॉर्ड करा, अशा प्रकारचे वक्तव्य संजय दिना पाटील यांनी केले होते.

Sanjay Dina Patil : शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यांनी खुलेआम ही धमकी दिल्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. शिंदे यांच्या शिवसेनेत शिस्त नाही. पक्षांतरानंतर संजय दिना पाटील यांच्या डोक्यात सत्ता आणि पैसे गेले आहेत. आपल्याला कोणीही काहीच करू शकत नाही, असं संजय दिना पाटील यांना वाटत असल्याचा आरोप विरोधकांनी तसेच ठाकरे गटाने केला आहे. दरम्यान, या प्रकरणाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेदतली आहे. संजय दिना पाटील यांनी शिवराळ भाषेचा वापर केल्याने तसेच पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
अन्यथा कारवाईला सामोरे जा
राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर आज (25 जून) देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत संजय दिना पाटील यांनी केलेल्या विधानावर चर्चा करण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणाची त्यांनी कठोर शब्दांत निंदा केली आहे. अशा खासदारांना कठोर शब्दांत समज द्यायला हवी, असेही फडणवीस या बैठकीत म्हणाले आहेत. गेल्या वर्षभरात काय काय घडलं, कोणी काय काय विधानं केली याचा पाढाही त्यांनी वाचून दाखवल्याचे समजते. तसेच महायुतीमध्ये अशा प्रकारची विधानं खपवून घेतली जाणार नाहीत. पत्रकारांबाबत अशा प्रकारची भाषा खपवून घेतली जाणार नाही. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही फडणवीस यांनी दिल्याचे सांगितले जात आहे.
संजय दिना पाटील यांनी भूमिका स्पष्ट करावी
संजय दिना पाटील हे सध्या महायुतीत आहेत. त्यांनी केलेल्या विधानात एका प्रकार राज्याच्या गृहखात्यालाही आव्हान देण्यात आलेले होते. कमिशनरकडे जा आणि तक्रार करा. व्हिडीओ रेकॉर्ड करा, अशा प्रकारचे वक्तव्य संजय दिना पाटील यांनी केले होते. त्यामुळे महायुती अडचणीत सापडली. म्हणूनच फडणवीस यांनी संजय दिना पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असा सूर फडणवीस यांचा होता. त्यावर आता एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.