
मुंबई महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा ऐरणीवर आला असून मराठी महापौर हवा. मराठी वाचवा असा नारा देत अनेक राजकीय पक्षांनी मराठीचा कैवार घेण्याची भूमिका अंगिकारली आहे. बीएमसी निवडणुकीत भाजपचे विविध स्टार प्रचारक उतरले असून उत्तर प्रदेश, बिहारमधील भाजपचे नेते आणि स्टारही इथे प्रचारासाठी आलेले दिसले. याच दरम्यान दक्षिण भारतातील भाषिकांसाठी तामिळनाडूतील भाजप नेते के अण्णामलाई हेदेखील प्रचारासठी मुंबईत आले होते. मात्र त्यावेळी त्यांनी केलेल्या एका विधानावरून अख्खं रान पेटलं आहे. त्यांनी मुंबईचा उल्लेख बॉम्बे असा केला. एवढंच नव्हे तर त्यावर कडी करत त्यांनी ‘बॉम्बे इज नॉट महाराष्ट्र सिटी ‘ असं विधान केल्याने विरोधकांच्या हाती चांगलंच कोलीत मिळालं.
यावरून राज्यात मोठा वाद पेटलेला दिसला. विरोधकांनी तर भाजपच्या या नेत्याचा जोरदार विरोध करत त्याच्यावर टीकास्त्र सोडलं. या सर्व मुद्यावर भाजपची भूमिका मात्र अद्याप समोर आली नव्हती. मात्र आता टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी अण्णामलाई यांचं विधान, त्यावरून झालेला वाद या सर्व मुद्यां वर स्पष्ट भाष्य केलं आहे. त्यावर एवढं लक्ष देऊ नका, असंही ते म्हणाले. टीव्ही9 मराठीचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेत त्यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला.
अण्णा मलाईंवर काय म्हणाले मुख्यमंत्री ?
मुळात अण्णा मलाई हे काही राष्ट्रीय नेते नाही. ते तामिळ लोकांच्या आग्रहाखातर इथे महाराष्ट्रात, मुंबईत प्रचारासाठी आले, ते नीट हिंदी बोलत नाही. आता मी जेव्हा तामिळनाडूला गेलो होते, तेव्हा बोलता बोलता आधी मद्रास म्हणालो. नंतर त्या लोकांनी लक्षात आणून दिलं म्हणून मी दुरुस्त करत चेन्नई असा उल्लेख केला. खरंतर आपली बोलण्याची एक सवय असते. त्यामुळे अण्णा मलाई यांच्या विधानावर एवढं लक्ष देऊ नका असं मुख्यमंत्री म्हणाले.
बॉम्बेचं मुंबई करणारे तुम्ही नाही, ते राम नाईक आहेत. तुमचा सपोर्ट आहेत. अण्णामलाई काही पंतप्रधानच आहेत, अशा पद्धतीने तुम्ही घेऊ नका. बॉम्बेचं मुंबई करण्याचं श्रेय आमचंच आहे. हे लोक बाळबोध आहे. जर बॉम्बेचं मुंबई करणारे आम्ही आहोत. तर मुंबईचं बॉम्बे करून आम्हाला काय मिळणार आहे? कोण आम्हाला समर्थन देणार ? आमचे मतदार किंवा पक्षातील लोकही समर्थन करणार का ? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी विचारला. बोलायला काही विषय नसतात तेव्हा हे विषय घेतले जातात, असा टोलाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी हाणला.