अजून बरेच व्हिडीओ समोर येतील… सीआयडीसोबत 1 तास 38 मिनिटे चर्चा केल्यानंतर धनंजय देशमुख यांचं सूचक विधान; बीडमध्ये मोठा भूकंप होणार?
आज संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सीआयडीच्या टीमची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेला आता एक महिन्यांपेक्षा अधिक काळ झाला आहे. या प्रकरणात सीआयडी चौकशी सुरू आहे. आज संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सीआयडीच्या टीमची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. वाल्मिक कराडचा खंडणी संदर्भातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, या व्हिडीओवर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली.
नेमकं काय म्हणाले धनंजय देशमुख?
आम्ही सीआयडी ऑफिसला दुपारी येणार होतो, त्यानंतर सोशल मीडियावर हा व्हिडिओ बघितला. आजचा जो व्हिडिओ आला ही सगळी माहिती सगळे गुन्हे कशाप्रकारे घडले ही कागदोपत्री माहिती ऑफिसकडे आहे. त्यावर तपास चांगल्या पद्धतीनं सुरू आहे. आम्हाला विचारलं जातं तुम्ही तपासावर समाधानी आहात का नाही? आम्ही एकच म्हणतोय तपास सुरू आहे. अजून बरेच असे व्हिडीओ समोर येणार आहेत, पुरावे जमा करण्याचे काम बऱ्यापैकी होत आलं आहे, असं धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी बालाजी तांदळेवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. बालाजी तांदळे नावाचा माजी सरपंच बीडच्या सीआयडी ऑफिसला पण होता. आम्हाला चुकीच्या भाषेत बोलला, मला धमकवण्याचा प्रयत्न केला. आरोपीचे फोटो दाखवत होता. माझ्या भावाच्या पाठीमागे जी स्विप्ट गाडी लावण्यात आली, ती गाडी देखील त्याच्याच घरी होती. आजच्या व्हिडीओमध्ये देखील तो दिसत आहे. त्याची कसून चौकशी झाली पाहिजे, त्याला आरोपी केले पाहिजे. तो प्रत्येक घटनेमध्ये वारंवार पुढे दिसत आहे. माजी यंत्रणेला विनंती आहे त्याची चौकशी करा, जो काही तपास समोर येथील तो आम्हाला सांगा.
तांदळे विरोधात अर्ज दिला होता. त्यावर अजून काही झालं नाही, आम्ही यापूर्वी अर्ज दिला होता. त्याचं वागणं चुकीच्या पद्धतीनं आहे. मी आज पुन्हा एकदा विनंती करतो, त्याची चौकशी करा तो शंभर टक्के आरोपी आहे, असंही यावेळी धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे.